मुंबई : आधीच रस्त्यांच्या कामांमुळे मुंबईकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असताना काही ठिकाणी नवा कोरा रस्ता पुन्हा पुन्हा खोदल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडते आहे. गिरगावातील बाबासाहेब जयकर मार्ग या रस्त्याचे नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. आता हा रस्ता पुन्हा एकदा खोदण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली आहे.

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते आहे. त्यातच काही ठिकाणी हे रस्ते पुन्हा पुन्हा खोदले जात असल्याच्याही तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. गिरगाव परिसरातील बाबासाहेब जयकर मार्गाचे तीन ते चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा या रस्त्याचा काही भाग खोदण्यात आला आहे. पुन्हा रस्ता खोदण्यात आल्यामुळे तेथील नागरिकांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. तसेच याच रस्त्यावर मुगभाट क्रॉस लेन जंक्शनजवळही बेस्टच्या कामासाठी १० ते १५ फूट रुंद खड्डा खणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. बाबासाहेब जयकर मार्ग, सिताराम पोद्दार मार्ग, पहिली खत्तरगल्ली यांची गेल्या चार महिन्यांपासून दयनीय अवस्था असल्याचेही आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गिरगावात रस्त्याच्या कामामुळे आधीच प्रदूषण झालेले आहे, वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामामागे नियोजन आहे की नाही, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित आहे. रस्त्यांची कामे करताना उपयोगिता वाहिन्या टाकण्यासाठी आधीच समन्वय साधला जातो की नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

कंत्राटदाराला दंड

याबाबत रस्ते विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, काँक्रिटीकरण केलेला रस्ता पुन्हा खोदण्यासाठी परवानगी दिली जात नाही, मात्र जयकर मार्गाच्या काँक्रिटीकरणात काही त्रुटी आढळल्यामुळे तेवढाच भाग पुन्हा कंत्राटदाराकडून त्याच्याच खर्चाने दुरुस्त करून घेतला जात आहे. त्याकरीता तो पुन्हा खोदण्यात आला आहे. अशा प्रकरणात कंत्राटदाराकडून दंडही वसूल करण्यात येतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांचा संकल्प खड्ड्यात घालतात अधिकारी…

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करून गुळगुळीत करण्याचा संकल्प सोडला होता. मात्र मुंबई महापालिका प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य शिंदे यांचा संकल्पच खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत का असा संशय निर्माण होत असल्याचा आरोप नाईक यांनी पत्रात केला आहे.

Story img Loader