पोलिसांनी चोरांकडून मुद्देमाल जप्त केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल. पण पोलिसांनी चक्क उंदरांकडून सोनं जप्त केलं असल्याचं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरंच घडलं आहे. मुंबईत दिंडोशी पोलिसांना उंदरांमुळे पाच लाख किंमतीचं १० तोळं सोनं सापडलं आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे.
नेमकं काय घडलं?
“आरे मिल्क कॉलनीत राहणाऱ्या सुंदरी या ४५ वर्षीय महिला घरकाम करतात. १३ जूनला दुपारी ज्यांच्या घऱी काम करतात त्यांनी तिला खाण्यासाठी पाव दिला होता. घऱातून निघाल्या तेव्हा त्यांच्याकडे १० तोळं सोनं होतं. ते सोनं बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्यांनी सोबत घेतलं होतं. रस्त्यात काही भीक मागणारी लहान मुलं दिसली असता त्यांनी त्यांना पावाची पिशवी दिली. यावेळी चुकून सोन्याची पिशवीही त्यांनी सोबत दिली. बँकेत गेल्यानंतर त्यांना सोन्याची पिशवी गायब झाली असल्याचं लक्षात आलं. चुकून लहान मुलांना आपण पिशवी दिली असल्याने त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी धाव घेतली. पण ती लहान मुलं तिथे नव्हती. यानंतर त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता काही सापडलं नाही,” अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “दिंडोशी पोलिसांनी गोरेगावमधून संबंधित मुलं आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा शोध घेतला. यावेळी त्यांनी आपण पावाची पिशवी कचऱ्यात फेकून दिली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगात पाहिलं तर पिशवी सापडलं नाही. यानंतर सीसीटीव्ही तपासलं असता उंदीर ती पिशवी गटारात घेऊन गेल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांनी संपूर्ण गटाराची पाहणी केली असता ती पिशवी आणि सोनं सापडलं”.
या सोन्याची किंमत तब्बल पाच लाख आहे. पोलिसांनी सर्व सोनं महिलेकडे सोपवलं आहे.