मुंबई: बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून ५०० आणि २०० रुपयांच्या एकूण २३ नोटा जप्त केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. रामलूश मिंझ (५१) असे अटक आरोपीचे नाव असून तो गोरेगाव परिसरातील रहिवासीआहे. शिवाजी नगर परिसरातील रफिक नगर येथील एका दुकाना आरोपी बुधवारी गेला होता. दुकानातून काही सामान घेतल्यानंतर त्याने दुकानदाराला २०० रुपयांची नोट दिली. मात्र दुकानदाराला या २०० रुपयांच्या नोटबद्दल संशय आला. त्यामुळे त्याने काही स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आरोपीला पकडले आणि याबाबत शिवाजी नगर पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा : शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सहा वर्षे अडगळीत, रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे अनावरणात अडसर
बनावट नोटांबाबत माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५०० आणि २०० रुपयांच्या एकूण २३ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या नोटा विक्रीसाठी स्वतःकडे ठेवल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपीने या नोटा कुठून आणल्या याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.