मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना अद्ययावत आणि अत्याधुनिक आरोग्यविषयक सोयी – सुविधा मिळाव्या यासाठी उपनगरीय रुग्णालयांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. गोवंडीमधील पंडित मदनमोहन मालवीय (शताब्दी) रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रुग्णालय उभारणीचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे शताब्दी रुग्णालय ऑक्टोबरपर्यंत रुग्ण सेवेसाठी सज्ज होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेंबूर, गोवंडी, बैंगनवाडी मानखुर्द, शिवाजी नगर परिसरातील नागरिकांच्या उपचारासाठी गोवंडीतील शताब्दी रुग्णालय हे महत्त्वाचे रुग्णालय समजले जाते. या रुग्णालयात अद्ययावत व अत्याधुनिक सोयी – सुविधांचा अभाव असल्याने या नागरिकांना केईएम, शीव, नायर, राजावाडी व जे.जे. रुग्णालयात जावे लागते. मुंबईतील सर्वच उपनगरीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेता महानगरपालिकेने रुग्णालयांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजावाडी, कांदिवली शताब्दी, भगवती, गोवंडी शताब्दी व अन्य रुग्णालयांचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये अद्ययावत वैद्यकीय सेवा-सुविधांबरोबरच खाटांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. या रुग्णालयात २१० खाटा आहेत. मात्र पुनर्विकासादरम्यान येथे ८६२ खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी तब्बल ३५६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रुग्णालयाचे काम जून २०२४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय उपकरणे बसवण्यात येणार आहेत. रुग्णालयात मॉड्यूलर शस्त्रक्रियागृहासह अद्ययावत प्रयोगशाळा, एक्स-रे, सोनोग्राफी आदी उपकरणे व तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत राहणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : मुंबई: तोतया तिकीट तपासनीसाला अटक

गोवंडी शताब्दी रुग्णालयाचाही पुनर्विकास करण्याचा निर्णय २००७ मध्ये महानगरपालिकेने घेतला. मात्र प्रत्यक्षात कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली. रुग्णालय डिसेंबर २०२२ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. तब्बल दोन वर्षे काम रखडल्यानंतर आता ते पूर्ण होत असून, ऑक्टोबर २०२४ मध्ये हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज होईल, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.