मुंबई : घरखरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करावी, असे आदेश महारेराने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिले होते. त्याचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील फक्त १९५ प्रकल्पांत अशा कक्षांची स्थापना करून अपेक्षित तपशील संकेतस्थळावर नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. विकासकांच्या या उदासीनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष प्रयत्न करणार आहे. सुरूवातीला घर खरेदी करताना किंवा नोंदणी करताना प्रकल्पाची पणन यंत्रणा ग्राहकांच्या संपर्कात असते. नंतर काही तक्रारी असल्यास, अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा हे अनेक प्रकल्पांत निश्चित केलेले नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मुंबईत संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाचा अंदाज

अशावेळी कुठे तक्रार करावी, याबाबत ग्राहक अनभिज्ञ असतो. अनेकदा अधिकृतपणे विश्वासार्ह माहिती मिळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊन तक्रारी वाढतात. त्यातून प्रकल्प पूर्णतेतही अडचणी येऊ शकतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ‘तक्रार निवारण कक्षाची’ स्थापना करावी, असे आदेश महारेराने परिपत्रकाद्वारे सर्व विकासकांना दिले होते. या कक्षात याच कामासाठी समर्पित किमान एक तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्प स्थळी ठळकपणे प्रदर्शित करावा. शिवाय विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही सूचना महारेराने केली होती.

हेही वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या रखडलेल्या फाईली मार्गी लागूनही मदतीत अडचण!

समर्पित तक्रार निवारण कक्षांमुळे तक्रारदाराला वेळीच अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळायला मदत होईल. शिवाय विकासकांनी किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निवारण केले ,याचा तपशीलही संकेतस्थळावर टाकल्यास प्रकल्पाची विश्वासार्हता वाढायलाही मदत होईल, असेही महारेराने स्पष्ट केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai grievance redressal cell for home buyers in only 195 projects mumbai print news css
Show comments