मुंबई : बोरिवलीतील मुंबई पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात उद्यानाच्या दर्शनी भागात गुजराती भाषेत नामफलक लावण्यात आला आहे. नागरिकांनी टीकेची झोड उठवताच पालिका प्रशासनाला जाग आली असून येत्या दोन दिवसांत गुजराती नामफलक हटविण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. यासंदर्भात उद्यान देखभालीची जबाबदारी दिलेल्या संस्थेला नोटीस बजावली आहे.
गेली काही वर्षे बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची देखभाल पोयसर जिमखान्यातर्फे केली जाते. उद्यानातील देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामे याच संस्थेमार्फत केली जातात. संस्थेने उद्यानातील मध्यभागी मराठी, तर इतर दोन बाजूला इंग्रजी आणि गुजराती भाषेत नामफलक लावला आहे. केंद्रच्या त्रिभाषा सूत्राप्रमाणे हिंदी आणि इंग्रजीसमवेत प्रादेशिक भाषा बंधनकारक आहे. त्यामुळे उद्यानात मराठी, इंग्रजीसह हिंदी भाषेचा समावेश होणे गरजेचे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. उद्यानात जाणीवपूर्वक गुजरातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वी अनेकदा मराठी भाषा डावलून गुजराती भाषेला प्राधान्य दिल्याच्या अनेक घटना बोरिवलीत घडल्या आहेत. बोरिवली, कांदिवली, तसेच मालाड परिसरात गेली अनेक वर्षे गुजरातीचा अतिवापर केला जात आहे. अनेक रस्त्यांची नावे, रेल्वे स्थानकांवरील सूचना, खाण्यापिण्याच्या वस्तूंवर हेतुपुरस्सर गुजरातीला प्राधान्य दिले जाते, असा आरोप स्थानिक रहिवासी प्रसाद गोखले यांनी केला.
हेही वाचा : स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल
गेल्या अठरा वर्षांपासून उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक आहेत. मात्र, आता अचानक महानगरपालिकेची नोटीस आली असून लवकरच गुजराती भाषेतील नामफलक हटविण्यात येईल, असे पोयसर जिमखान्याशी संलग्न असलेल्या स्वा. सावरकर उद्यानाचे अध्यक्ष नितीन प्रधान यांनी सांगितले.