मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली – वरळीदरम्यानचा साडेतीन किमी लांबीचा टप्पा येत्या एक – दोन दिवसांत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली असून मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामाची मंगळवारी पाहणी केली. पावसाने उसंत घेतल्यास उर्वरित कामे पूर्ण करून एक – दोन दिवसांत हाजीअली – वरळीदरम्यानचा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येत आहेत. यापूर्वी हाजीअली – मरिन ड्राईव्हदरम्यानची मार्गिका सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मरिन ड्राईव्ह – हाजीअलीदरम्यानची मार्गिका सुरू करण्यात आली. आता या प्रकल्पातील उत्तर मुंबईकडे जाणारी हाजीअली – वरळीदरम्यानची मार्गिका लवकरच सुरू होणार आहे. उत्तर वाहिनीमार्गावर हाजीअलीपासून खान अब्दुल गफार खान मार्गे राजीव गांधी सागरी सेतू दरम्यानची सुमारे साडेतीन किलोमीटर उत्तर दिशेच्या मार्गिकेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या कामांची पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी यांच्यासह अभियंते, अधिकारी, सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते. या साडेतीन किमीच्या टप्प्यातील काही कामे शिल्लक असून ती एक दिवसात पूर्ण होतील. मात्र पावसाने उसंत घेतल्यास ती कामे होऊ शकतील. त्यामुळे येत्या एक – दोन दिवसांत उत्तर मार्गिकेचा साडेतीन किमीचा टप्पा खुला होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: …तरी जयभीम नगरमधील झोपड्यांवर कारवाई का ? उच्च न्यायालयाची महापालिका, राज्य सरकारला विचारणा

वांद्रे – वरळी सागरी सेतूसाठी प्रतीक्षा

सागरी किनारा रस्ता पुढे वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो स्ट्रींग आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केल्यानंतर दोन्ही मार्गिकांच्या कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाची कामे अद्याप बाकी असल्यामुळे वाहनचालकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

हेही वाचा: मुंबईत तीसहून अधिक प्राण्यांचे पुरात रक्षण

वाहतूक कोंडी कमी होणार

हाजीअली – वरळीदरम्यानची चार पदरी मार्गिका लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार असून हाजीअली – वरळी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हाजीअलीपर्यंतच मार्गिका सुरू असल्यामुळे वरळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

Story img Loader