मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत तसेच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात तालुका पातळीवर होणारे नातेवाईकांचे हाल लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये महापालिकेच्या शववाहिन्या असतात तसेच मोठ्या प्रमाणात खाजगी शववाहिन्याही उपलब्ध असतात. महापालिका क्षेत्रात तसेच शहरी भागात पालिका रुग्णालये, शासकीय वा खाजगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालये ते घर वा स्मशानभूमीपर्यंत मृतदेह वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोफत तसेच पैसे भरून शववाहिन्या उपलब्ध होतात. मात्र याच्या उलट परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. प्रामुख्याने करोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असताना मृतदेह वाहून नेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. आजही ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह खाजगी जीप वा बैलगाडीमधून न्यावा लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मृतदेह वाहून नेण्यासाठी फारशी व्यवस्था नसल्यामुळे लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने याबाबत पुढाकार घेऊन व्यवस्था करावी, अशी मागणी वेळोवेळी विधिमंडळाच्या अधिवेशनातही करण्यात आली आहे.
हेही वाचा : मुंबई : रेल्वे स्थानकांवर विद्युत रोषणाई
राज्यातील २५ महापालिका क्षेत्रात काही प्रमाणात मृतदेह वाहून नेण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र तालुकास्तरावर तसेच आदिवासी भागात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिनी घेण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला. यानुसार एकूण ३५२ शववाहिनी खरेदी करण्यात येणार असून यासाठी आगामी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात प्रती शववाहिनी ३५ लाख रुपये याप्रमाणे १२३ कोटी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ही आर्थिक तरतूद झाल्यास ग्रामीण भागात रुग्णांच्या नातेवाईकांचा मृतदेह स्थलांतरणाचा प्रश्न सुटेल असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
हेही वाचा : अटल सेतूवरील पहिला अपघात कॅमेऱ्यात कैद; ताबा सुटल्याने थेट दुभाजकाला दिली धडक, पाहा Video
“ग्रामीण भागात तसेच दुर्गम व आदिवासी भागात रुग्णालयामधून मृतदेह घरी नेणे ही अवघड बाब आहे. खाजगी रुग्णवाहिका घेतल्यास मोठ्या प्रमाणात खर्च येतो व हा खर्च करणे नातावाईकांना अनेकदा परवडणारे नसते. शहरी भागात हा प्रश्न नाही. मात्र ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला आहे. या विषयावर अधिकारी स्तरावर सर्वंकष चर्चा केल्यानंतर प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिनी खरेदी करण्याची भूमिका घेण्यात आली आहे”, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.