मुंबई: रविवारी मध्यरात्री मुंबईत पडलेल्या पावसामुळे पालिकेचे सगळे नालेसफाईचे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणांचे दावे फोल ठरले. पाणी भरू नये म्हणून करण्यात आलेल्या उपायांची यादी यंत्रणांकडून दिली जात असताना यंदाही पहिल्याच मुसळधार पावसाने हिंदमाता, मिलन सबवे, शीव येथील गांधी मंडई, अंधेरी सबवे पाण्याखाली गेले. भूमिगत टाकी बांधलेली असतानाही हिंदमाता परिसरात पाणी भरले त्यामुळेही आश्चर्य व्यक्त होते आहे.
रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. सकाळी सात वाजेपर्यंत पडणाऱ्या पावसाने संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले. शहर भागात पावसाचा जोर कमी होता मात्र तरीही हिंदमाता आणि शीव येथील गांधी मंडई परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे गांधी मंडई परिसरातील वाहतूक वळवावी लागली. सकाळी दहा – साडेदहा वाजेपर्यंत या परिसरात रस्त्यावर पाणी होते.
हेही वाचा : मुंबईत कुठे किती पाऊस ? पश्चिम उपनगरात १६५.९३, मुंबई शहरात ११५.६३ मिलीमीटर पाऊस
परळ परिसरातील हिंदमाता भागाची पाणी तुंबण्यापासून सुटका व्हावी म्हणून पालिकेने तेथे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग केला होता. गेल्यावर्षी या परिसरात पाणी तुंबले नव्हते. त्यामुळे पालिकेने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. यंदा मात्र हिंदमाता परिसर पुन्हा जलमय झाला आहे. अद्याप पावसाला पुरेशी सुरूवात झालेली नसली तरी यंदा दोनवेळा हिंदमाता परिसरात पाणी साचले. १५ जूनला पडलेल्या पावसातही हिंदमाता परिसरात पाणी साचले होते. त्यानंतर रविवारी पडलेल्या पावसातही हिंदमाता परिसरात पाण्याचा निचरा हळूहळू होत होता.
दरम्यान, हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांची क्षमता ताशी ५५ मिमी पावसाचे पाणी साठवू शकेल एवढीच असून त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर पाणी साचू शकते पण त्याचा लवकर निचरा होईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली. १५ जूनला या परिसरात ताशी १२६ मिमी पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर ७ जुलैच्या रात्री या परिसरात २४ तासात ११० मिमी पाऊस पडल्याची नोंद एफ दक्षिण कार्यालयाच्या पर्जन्य मापक यंत्रावर झाली.
अंधेरी सबवे पाण्याखाली…
रविवारच्या पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद ठेवावी लागली आहे. एकूणच जुहू परिसरात पाणी साचले होते. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तीन वेळा सबवे बंद करण्याची वेळ आली आहे. अंंधेरी गोखले पुलाचे काम सुरू असल्यामुळे अंधेरीतील मोगरा नाला रुंदीकरणाची कामे गेली दोन वर्षे हाती घेता आली नाहीत. त्यामुळे या पावसाळ्यातही अंधेरी सबवे पाण्याखाली जाणार हे निश्चित आहे. मोगरा नाल्यात मलनिस्सारण वाहिन्यांमधील प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा नाला पावसाळा नसतानाही वाहत असतो. त्यामुळे ताशी केवळ २० मिमी पाऊस पडला तरी या परिसरात पाणी भरते. दुचाकी, गाड्या सबवेमध्ये अडकून पडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साचले की हा सबवे बंद केला जातो.