मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणाऱ्या, शीव स्थानकावरील अत्यंत महत्वाच्या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी रात्रीपासून उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे.

अंधेरी येथील गोखले पूल पडल्याने मुंबईतील ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांची तपासणी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबईने (आयआयटी) यांच्याद्वारे करण्यात आली. त्यात ब्रिटिशकालीन, ११२ वर्षे जुना शीव रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल जीर्ण अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सद्यस्थितीतील उड्डाणपूल पाडून, त्याजागी स्टीलच्या तुळया (गर्डर) आणि आरसीसी स्लॅबसह उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारस केली.

हेही वाचा…आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुण्यातील कर्मचाऱ्याचे, ११ मे रोजी अपघातात बोट कापल्याचा दावा

मध्य रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूलच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्याची योजना आखण्यात आली. सर्व यंत्रणा हे पाडकाम करण्यासाठी सज्ज झाली होती. मात्र स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले होते. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे प्रशासनाची भेट घेत दहावी, बारावीच्या परीक्षा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन पुलाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे पुलाचे पाडकाम वारंवार पुढे ढकलण्यात आले. २० जानेवारी, २८ फेब्रुवारी, २८ मार्च या दिनी पूल बंद करून पाडकाम केले जाणार होते. मात्र वारंवार पुलाच्या पाडकामाची तारीख पुढे ढकलली गेली. सध्या शीव उड्डाणपुलाचे पाडकाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता पावसाळ्यातील धोका लक्षात घेता जड वाहनांना या पूलावरून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेचा उपाय म्हणून शीव उड्डाणपुलावरून अवजड वाहनांचा प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेश बंद केला जाईल. उड्डाणपुलावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूंना उंची मापक लावले जातील. उंची मापक ३.६० मीटरचे असतील.

हेही वाचा…हिजाब बंदीचा आदेश एकसमान वस्त्रसंहितेसाठी, चेंबूरस्थित महाविद्यालयाचा उच्च न्यायालयात दावा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने संरचनात्मक तपासणी अहवालात (स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट) शीव उड्डाणपुल असुरक्षित असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. पावसाळ्यात शीव उड्डाणपुलाचे पाडकाम करणे गैरसोयीचे ठरणार आहे. अद्याप या पुलाच्या पाडकामाबाबत परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळाल्यास पाडकाम सुरू होईल. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे