मुंबई : घरांच्या विक्रीत देशातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचे स्थान कायम असून मावळत्या वर्षात ८६ हजार ८७१ घरांची विक्री नोंदवली गेली आहे. गेल्या ११ वर्षातील ही सर्वाधिक घरविक्री असल्याचा दावा नाईट फ्रँक या सर्वेक्षण कंपनीने केला आहे. याशिवाय यंदा ९३ हजार ५१ घरे विक्रीसाठी नव्याने उपलब्ध झाली असून हाही २०१४ नंतरचा विक्रम असल्याचे या कंपनीने जारी केलेल्या सहामाही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या वर्षात घरांच्या किमतीत सरासरी सात टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा घरांच्या विक्रीत झालेली वाढ वा नव्याने घोषित झालेल्या प्रकल्पांची संख्या प्रामुख्याने पूर्व उपनगरात अधिक होती. त्याखालोखाल पश्चिम उपनगराचा क्रमांक लागतो. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत मुंबईने घरविक्रीत बाजी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. यंदा नवरात्री, दसरा आणि दिवाळीत घरविक्री मोठ्या प्रमाणात झाली. मुंबई महानगर परिसरातील छोट्या घरांना खरेदीदारांनी पसंती दर्शविली. त्याच वेळी दक्षिण व मध्य मुंबईतील महागडी घरेही २०२२ च्या तुलनेत मोठ्या संख्येने विकली गेली. मात्र एक ते दोन कोटी किमतीच्या घरांना अधिक मागणी होती, असेही या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : मालमत्ता कराची देयके वाटली, करदात्यांनी पैसेही भरले; आता प्रशासनाचे निरीक्षकांना पावती संकलनाचे फर्मान

करोनानंतरच्या काळात आता पहिल्यांदाच घरविक्री व नव्या घरनिर्मितीला बऱ्यापैकी वेग आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ५० लाख ते एक कोटी किमतीच्या विक्रीत यंदा लक्षणीय वाढ झाली. ही वाढ १५ टक्के असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, ५० लाख पेक्षा कमी किमतीची ३९ हजार ९३ घरे विकली गेली तर ५० लाख ते एक कोटी किमतीची २६ हजार ६१० तर एक कोटीवरील किमतीच्या २१ हजार १६७ घरांची विक्री झाली. लोअर परळ, वरळी, मुलुंड, वाशी येथे चार टक्के, घाटकोपर, नौपाडा येथे पाच टक्के, पवई, अंधेरी, पनवेल, खारघर येथे सहा टक्के, बोरिवली, गोरेगाव, मीरा रोड येथील घरांच्या किमतीत आठ टक्के वाढ नोंदविली गेली.

हेही वाचा : मुंबई : महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक कसे ? पदपथावरील बोलार्डमधील कमी अंतरावरून उच्च न्यायालयाने फटकारले

नाईट फ्रँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांच्या मते, घरविक्रीत येत्या काही महिन्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय घरांच्या किमतीतही काही प्रमाणात आणखी वाढ होईल, असे त्यांनी म्हटले आहे. नव्याने घरनिर्मिती होत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिक्त घरांची विक्रीही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai home prices rise by 7 percent highest home sold in 2023 mumbai print news css
Show comments