मुंबई : फलाटाची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने तीन दिवस घेतलेल्या जम्बो ब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना रुग्णालय गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागले. लोकलमधून वडाळा वा भायखळ्यापर्यंत आणि पुढे बेस्ट अथवा एसटीच्या बसगाड्यांमधून प्रवास करीत या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय गाठले. मात्र रुग्ण सेवा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी द्राविडीप्राणायाम करीत रुग्णालयीन कर्मचारी वेळेवर रुग्णालयात पोहोचले. त्यामुळे शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, पालिका रुग्णायांमधील शनिवारी अर्धवेळ सुरू असलेला बाह्यरुग्ण विभाग आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना असलेली सुट्टी यामुळे रुग्णालयीन कामकाजावर फारसा परिणाम झाला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटाची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारपासून सलग तीन दिवस जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. जम्बो ब्लॉक च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारपासून मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या भायखळा स्थानकापर्यंतच चालवण्यात येत होत्या. तेथून पुढे जाण्यासाठी बेस्ट व एसटीच्या बसगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भायखळा येथून बेस्ट व एसटीच्या गाड्यांमधून रुग्णालय गाठले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे रुग्णालयातील परिचारिकाही सकाळच्या पाळीत नियमितपणे हजर राहिल्या. त्यामुळे सकाळपासूनच रुग्णालयातील कामकाज सुरळीत सुरू होते.

हेही वाचा…मेमध्ये मुंबईतील १२००० घरांची विक्री

तसेच शुक्रवारप्रमाणे शनिवारीही हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्मचारी व परिचारिका कामावर गैरहजर होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील बाह्यरुग्ण विभाग शनिवारी अर्धवेळ चालवण्यात येत असल्याने रुग्णांची संख्या कमीच असते. त्यामुळे रुग्णसंख्येवरही फारसा परिणाम दिसून आला नाही. त्याचप्रमाणे शासकीय नियमानुसार शनिवारी प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुट्टी असल्याने कामकाज बंद होते. त्यामुळे प्रशासकीय कामावरही कोणताही परिणाम झाला नसल्याचे निदर्शनास आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai hospitals maintain smooth operations amid central railway s jumbo block staff had stuggle to come to duty mumbai print news psg