मुंबई : मालाड येथील लिबर्टी मार्गावरील जवाहरलाल नेहरू क्रीडांगणानजीकचा पालिकेने नोटीस बजावलेला अनधिकृत डिजिटल फलक बुधवारी रात्री आठच्या सुमारास हटविताना कोसळला. हा फलक एका वृद्ध व्यक्तीच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. परिणामी, संबंधित व्यक्तीने मालाड पोलीस ठाण्यात जयकिरण कन्स्ट्रक्शनचे विकासक आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर येथील पोलीस वसाहतीनजीकच्या पेट्रोल पंपावर महाकाय फलक कोसळून १७ जणांचा बळी गेला. तसेच, ७० हून अधिक नागरिक या दुर्घटनेत जखमी झाले. त्यानंतर, पालिकेने अनधिकृत फलकांविरोधातील कारवाईला वेग देत अनेक अनधिकृत फलक हटविले. अद्यापही अनधिकृत फलक हटविण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, मालाड येथील जयकिरण कन्स्ट्रक्शन कंपनीने इमारत बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची काळजी न घेता २५ – १० आकाराचा फलक लावला होता. ही बाब लक्षात येताच पालिका प्रशासनाने जयकिरण कन्स्ट्रक्शनला फलक हटविण्याबाबत नोटीस बजावली होती. त्या नोटीसीनुसार, संबंधित विकासकाने डिजिटल फलक हटविण्याचे काम हाती घेतले. मात्र, फलक बुधवारी रात्री हटविताना तेथून जाणारे महेंद्र कुर्ले (६२) यांच्या अंगावर फलक पडला. या दुर्घटनेत ते जखमी झाले.
या प्रकरणी कुर्ले यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन जयकिरण कन्स्ट्रक्शन आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.