मुंबई : मैदानातील धुळीमुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवाजी पार्क मैदानात अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्या जात असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. स्काऊट गाइड सभागृहाच्या मागील बाजूस खासगी कार उभ्या असल्याबद्दल रहिवाशांनी आक्षेप घेतला असून या गाड्या न हटवल्यास रहिवाशी स्वत:च्या कार मैदानात उभ्या करतील, असा इशारा रहिवासी संघटनेने दिला आहे.

शिवाजी पार्क मैदानावर आता बेकायदा पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्यांचा विषय चर्चेत आला आहे. गेल्या रविवारी या मैदानावर मोठ्या संख्येने गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. स्काऊट गाइड हॉललगतचे प्रवेशद्वारही खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे पालिकेने आता मैदानावर वाहनतळ सुरू केले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत शिवाजी पार्क रहिवाशी संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले की, मैदानात कोणतीही गाडी उभी करण्याची परवानगी नाही. मात्र स्काऊड गाइड सभागृहात लग्न वा कार्यक्रम असले की त्याचा त्रास रहिवाशांना होतो. स्काऊड गाइड सभागृह चालवणाऱ्यांकडून भाडेकराराचे अनेक बाबतीत उल्लंघन केलेले आहे. मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. स्काऊट गाइड सभागृहाच्या वास्तूत अनधिकृत बांधकामही करण्यात आहे. आता तर मैदानात या लग्न समारंभाच्या गाड्याही उभ्या राहत असतील तर त्याला आमचा विरोध असेल. केवळ मैदानावर जेव्हा कार्यक्रम असतो, तेव्हाच मैदानात गाडी उभी करता येते. न्यायालयाने मैदानात कार्यक्रम करण्यासाठी ४५ दिवस आखून दिले आहेत. मग इतर वेळी जर गाड्या उभ्या असतील तर ते दिवस या ४५ दिवसांतून कमी करणार का, असा सवालही बेलवाडे यांनी केला.

दरम्यान, ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी सांगितले की, मैदानात गुरुवारी (ता. २७) मराठी भाषा दिन कार्यक्रम होत आहे. तयारीसाठी हे प्रवेशद्वार खुले ठेवले होते. त्यामुळे इतरही गाड्या प्रवेशद्वारातून आत आल्या व उभ्या केल्या होत्या. मात्र विभागाने या गाड्या हटवण्याची कारवाई केली. तसेच स्काऊट गाइड सभागृह व्यवस्थापनालाही या प्रकरणी नोटीस दिल्याचे त्यांनी सांगितले.

स्काऊट गाइड विभागाने आरोप फेटाळले

आमचा आणि त्या गाड्यांचा काही संबंध नाही. आमच्याकडे कोणतेही कार्यक्रम असले की गाड्या उभ्या करण्यासाठी जागा नाही असे आधीच स्पष्ट करण्यात येते. गाडी उभी करण्यासाठी तुमची व्यवस्था तुम्ही करायची. लग्न किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असले तरी आम्ही त्यांना हेच सांगतो. पण कार्यक्रमासाठी प्रवेशद्वारे उघडलेली असल्यामुळे या गाड्या कोणी तरी उभ्या केल्या असतील. त्याच्याशी आमचा संबंध नाही. स्काऊट गाइडची वास्तू बाजूला आहे. त्यामुळे या गाड्या आमच्या कार्यक्रमास आलेल्यांच्या होत्या असे नाही. गाड्या उभ्या असतील तर त्या वाहतूक पोलिसांना बोलवून हटवाव्या, दंड करावा आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया स्काऊट गाइड सभागृहाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र स्काऊट गाइड हा राज्य सरकारच्या क्रीडा विभागाअंतर्गत येत असून ही जागा महापालिकेने त्यांना भाडेकरारावर दिली आहे.

Story img Loader