मुंबई : मुंबईत येत्या २० मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत १८ ते २० मेदरम्यान मद्यविक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. शनिवार, १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत मद्य विक्रीला बंदी करण्यात आली आहे.
मतदान कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येत्या १८ ते २० मे दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील मद्याची सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २० मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित दुकाने बंद राहतील.
हेही वाचा…एमबीए – एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
निवडणूक कालावधीत प्रशासनाकडून गस्ती पथक तैनात करण्यात आले असून, त्या पथकांकडून अवैध मद्यविक्री, अवैध वाहतूक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद राहावेत, यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन, तसेच रात्री गस्त घालण्यात येत आहे. अवैध मद्याबाबतच्या तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ कार्यान्वित करण्यात आला आहे.
हेही वाचा…मुंबई : मोतीलाल नगरचे ड्रोनने सर्वेक्षण
नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत. अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.