मुंबई : मुंबईत गेल्या तीन महिन्यांत ११ हजार ३४९ क्षयरोगींची नोंद झाली असून गेल्या वर्षभरात ६० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे उपचारांचा यशाचा दर ८० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मागील आठ वर्षांमध्ये औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये वर्ष २०२४ मध्ये ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले, त्यापैकी ५३ हजार ६३८ क्षयरोगाचे रुग्ण मुंबईतील रहिवासी आहेत. क्षयरोगाच्या एकूण रुग्णांपैकी ३८ टक्के हे फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आणि ६ टक्के बालरुग्ण होते. तसेच ९ टक्के हे औषध-प्रतिरोधक रुग्ण होते. क्षयरोग रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने निदान प्रक्रिया, सेवा यांत सुधारणा केली आहे. नवीन औषध उपचार पद्धती आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने डीआरटीबी रुग्णांना केलेल्या मार्गदर्शन व सहाय्यामुळे औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मागील आठ वर्षांत उपचारांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

केंद्रीय क्षयरोग विभाग आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या २६ विभागांमध्ये ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात आलेल्या मोहमेंतर्गत १५ लाखांहून अधिक उच्च जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात संभाव्य क्षयरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर ६०,९४४ नॅट चाचण्या केल्या. उच्च जोखीम असलेल्या घटकांची ओळख पटवून, योग्य व्यवस्थापन आणि उपचारातील परिणाम सुधारण्यासाठी मोबाइल क्ष किरण व्हॅन, ४४ सीबीनॅट आणि ३४ ट्रूनॅट मशीन उपलब्ध आहेत. आतापर्यंत ११ हजार ३४९ क्षयरुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांसाठी ‘बीपाल एम’ उपचारपद्धती

मुंबईतील औषध प्रतिरोधक क्षयरुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रामध्ये ३१ औषध प्रतिरोधक क्षयरोग दवाखाने (डीआरटीबी क्लिनिक्स) सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये औषध प्रतिरोधक रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी केवळ ६ महिन्यांच्या कालावधीसाठी असलेली ‘बीपाल एम’ औषधोपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत ४३ औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांवर ‘बीपाल एम’ उपचार सुरू केले आहेत. लवकरच अन्य पात्र रुग्णांनाही ही औषधोपचार पद्धती सुरू करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपक्रम

डिसेंबर २०२४ पासून मुंबईतील १२ विभागांमध्ये आयसीएमआरच्या सहकार्याने प्रौढ नागरिकांसाठी बीसीजी लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. मार्च २०२५ पर्यंत १६ हजार ७३५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ‘नि-क्षय मित्र’ उपक्रमांतर्गत, मागील २ वर्षांत १ लाख १८ हजार ६३३ लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.