मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आगामी अंदाजे २००० घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त ८८ घरांचा समावेश आहे. या घरांसाठी इच्छुक असलेल्यांसाठी दिलासादायक बाब आहे. मुंबईतील पीएमएवाय योजनेतील या घरांसाठी आता वार्षिक सहा लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा वार्षिक तीन लाख रुपये अशी होती.

मुंबईत पहिल्यांदाच पीएमएवाय योजनेअंतर्गत गोरेगाव पहाडी येथे १९०० हुन अधिक घरे बांधण्यात आली आहेत. या घरांचा समावेश मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ च्या सोडतीत केला होता. ३२२ चौ फुटाच्या या घरांची विक्री किंमत ३० लाख ४४ हजार रुपये अशी होती. अत्यल्प गटासाठी ही घरे होती. दरम्यान म्हाडा सोडतीच्या नियमानुसार अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक सहा लाखांपर्यँत अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पण पीएमएवाय योजनेसाठी मात्र वार्षिक तीन लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. त्यामुळे गोरेगावमधील पीएमएवाय योजनेतील घरांसाठीही वार्षिक तीन लाख रुपये अशी कौटुंबिक उत्त्पन्न मर्यादा लागू झाली असून त्यानुसारच ऑगस्ट २०२३ मध्ये घरांची विक्री करण्यात आली. या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला असला तरीही अनेक इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकले नाहीत.

हेही वाचा : ‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करता तीन लाख वार्षिक उत्पन्न मर्यादेत बसणारे अर्जदार खूपच कमी असल्याने मोठ्या संख्येने इच्छुक अर्ज भरू शकले नाहीत. ही बाब लक्षात घेता म्हाडाने मुंबई महानगर प्रदेशासाठी पीएमएवाय योजनेतील घरांसाठी वार्षिक सहा लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा लागू करावी अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे केली होती. हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आहे. त्यानुसार कोकण मंडळाने ही उत्पन्न मर्यादा लागू केली आहे. आता मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी ही नवीन उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे. तेव्हा आता मुंबई मंडळातील पीएमएवाय घरांसाठी वार्षिक सहा लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असणारे इच्छुक अर्ज भरू शकतील.