मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जे.जे. रुग्णालयातील कॅथलॅबचे नुकतेच अद्यययावतीकरण करण्यात आले. मात्र अधिकाधिक नागरिकांना अद्ययावात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये या वर्षात आणखी दोन कॅथलॅब उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे हृदयाविकार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळू शकेल.
मुंबईतील सर्वाधिक अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया जे.जे. रुग्णालयात करण्यात येतात. मात्र मागील काही दिवसांपासून जे.जे. रुग्णालयाच्या कॅथलॅबमधील दोनपैकी एक यंत्र बंद होते. राज्य सरकारने नुकतेच या केंद्राचे अद्यायवतीकरण केले. या केंद्रात एक नवीन यंत्र आणण्यात आले. या अद्ययावत कॅथलॅबमुळे सर्वसामान्य रुग्णांना अँजिओप्लास्टीसाठी निश्चितच फायदा होणार आहे. जे. जे. रुग्णालयातील कॅथलॅबच्या अद्ययावतीकरणामुळे दररोज अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी आणि हृदयाची झडप बदलण्याच्या १५ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहेत. दरवर्षी पाच हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहेत. त्यामुळे यापुढे रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा… मुंबई : मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम शैलभित्ती स्थापित
हेही वाचा… जाळ्यात अडकून १३८ कासवांचा मृत्यू, पोटात आढळली १०० हून अधिक अंडी
रुग्णालयातील येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता आता जे.जे. रुग्णालयामध्ये या वर्षांमध्ये आणखी दोन कॅथलॅब सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील कानाकोऱ्यातून येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना ॲजिओप्लास्टीची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करुन देणे शक्य होईल, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. या दोन कॅथलॅबसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वतोपरी सहकार्य आणि आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचेही डॉ. सापळे यांनी सांगितले.