मुंबई : पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग येथील पालिकेच्या कचराभूमीतून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही या प्रश्नावर अद्याप कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यासंदर्भात केव्हा कारवाई करणार, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कांजूरमार्ग कचराभूमीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या प्रश्नाकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यासंदर्भात कारवाई का केली जात नाही, याबाबत दिरंगाई करण्याचे कारण काय असे प्रश्न संतप्त रहिवाशांनी उपस्थित केले आहेत. या दुर्गंधीचा कांजूरमार्ग, भांडूप आणि विक्रोळीमधील रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना सकाळी फिरायला किंवा रात्री जेवणानंतर बाहेर फेरफटका मारणे कठिण झाले आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याच्या भितीने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजार बळाविण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच राज्य सरकारचा नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटीस पाठवली आहे. तरीसुद्धा याप्रकरणी कोणतेच ठोस पाऊल का उचलले जात नाही. दुर्गंधीमुळे परिसरात राहणे अशक्य झाले असतानाही अद्याप याबाबत योग्य ती करावाई करण्यात आलेली नाही, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
समाज माध्यमावरही टीका
याप्रकरणी सध्या समाज माध्यमांवर ही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागली आहे.
डास, कीटकांचा प्रदुर्भाव वाढण्याची शक्यता
कचरा टाकण्यात येत असलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डेंग्यू, हिवतापासारखे आजार होण्याची शक्यता आहे. सतत दुर्गंधी येत असल्यामुळे श्वासोच्छवासाचाही त्रास होऊ शकतो. यामुळे मळमळ, सतत उलट्याही होऊ शकतात, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता मधुकर गायकवाड यांनी सांगितले.
मुलुंड पूर्व आणि ठाणे भागालाही फटका
या दुर्गंधीचा त्रास याआधी कांजूरमार्ग, भांडूप आणि विक्रोळी येथील रहिवाशांना होत होता. आता मात्र या दुर्गंधीचा त्रास मुलुंड पूर्व आणि ठाणे भागातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.