मुंबई : सोबत दारू प्यायला आला नाही म्हणून मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार ॲन्टॉप हिल परिसरत घडला. या हल्ल्यात आफताब वझीर शेख (२१) गंभीर जखमी झाला असून त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारा आरोपी शाहिद रियाज अन्सारी (२२) याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.

ॲन्टॉपहिल परिसरातील ए. ए. इंटरप्रायझेस दुकानासमोर हा प्रकार घडला. तक्रारदार शेख ॲन्टॉप हिल येथील महाराष्ट्र नगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपी अन्सारी हाही ॲन्टॉप हिल परिसरातील विक्रांत सोसायटीमध्ये राहतो. दोघेही चांगले मित्र असून दोघेही बुधवारी रात्री ए. ए. इंटरप्रायजेससमोर पानाच्या दुकानाजवळ भेटले. ओमी पंजाब बारमध्ये आपल्यासोबत दारू पिण्यासाठी का आला नाही, अशी विचारणा अन्सारीने तक्रारदार शेखकडे केली. शेखने सुरूवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अन्सारी संतापला. त्याने शेखला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अन्सारीने कोयत्याने शेखवर हल्ला केला. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्याची मोबाईल व्हॅन क्रमांक २ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अन्सारीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

शेखला जखमी अवस्थेत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. आरोपी अन्सारी आपला चांगला मित्र असून त्याच्यासोबत दारू पिण्यासाठी गेलो नाही म्हणून त्याने हल्ला केल्याचे शेखने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शेखच्या तक्रारीवरून अन्सारी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०९ अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अन्सारीला अटक केली. अन्सारीविरोधात यापूर्वी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. शेखच्या उजव्या हाताचा कोपर, दोन्ही पायांच्या गुडघ्याखाली कोयत्याचे वार आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने हात वर केला होता. अन्यथा आरोपीने त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारला होता, असे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात वापरलेला कोयता अद्याप पोलिसांना सापडलेला नसून पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.

Story img Loader