मुंबई : पश्चिम, मध्य, कोकण आणि दक्षिण भारतातील रेल्वे मार्गावरून धावणारी गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसला नव्या धाटणीचे लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे डब्यांची वाढविण्यात आलेली लांबी आणि रूंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपातील गाड्या आणि त्यातही वाढलेला वेग यामुळे गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या ३२ वर्षांपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या रेल्वे मार्गावरून गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसचा प्रवास होत आहे. गांधीधाम-नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस ही दक्षिण रेल्वे क्षेत्राशी संबंधित एक्सप्रेस आहे. पश्चिम रेल्वेवरील गांधीधामवरून या एक्स्प्रेसची सेवा सुरू होऊन, दक्षिण रेल्वेच्या नागरकोइल या स्थानकापर्यंत धावते. ही एक्स्प्रेस गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या पाच राज्यातून २,३४१ किमी प्रवास करते. या राज्यातील ५५ स्थानकांवर ही एक्स्प्रेस थांबा घेते. महाराष्ट्रात बोईसर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड या स्थानकात थांबते. कोकणातील रेल्वे स्थानकात थांबत असल्याने, कोकणवासियांसाठी ही एक महत्त्वाची रेल्वेगाडी आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे निळ्या रंगातील डब्या ऐवजी लाल-करडा अशा रंगात एक्स्प्रेस असेल. कोकणवासियांना नव्या स्वरूपातील एक्स्प्रेसचा अनुभव घेता येणार आहे.

हेही वाचा : ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच रेल्वेगाड्यांना एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय घेतला होता. या एलएचबी डब्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडते. तसेच रेल्वेगाड्यांचा वेगही वाढवण्यास मदत होते. गाडी क्रमांक १६३३६ नागरकोइल-गांधीधाम एक्स्प्रेसला २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आणि गाडी क्रमांक १६३३५ गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडले जाणार आहेत. या एक्सप्रेसला एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा, पाच तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे, ११ शयनयान, २ जनरल डबा, १ एसएलआर डबा, १ पॅन्ट्री कार डबा, १ जनरेटर कार असे एकूण २२ डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai lhb coaches to be added trains running on konkan routes for passenger safety mumbai print news css