मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता मुंबई महापालिकेत सुरू असलेला पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप कमी होणार आहे. पालिका मुख्यालयात होणाऱ्या बैठका, घटनास्थळावरील भेटीगाठी थंडावणार आहेत. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणूक- २०२४ संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यात मुंबईतील सर्व फलक तत्काळ हटवावे, असेही आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आचारसंहितेमुळे आता पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपावरही बंधने येणार आहेत.
मुंबई महापालिकेत सध्या शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नियमित बैठका होत असतात. जुलै महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर केसरकर यांनीही मुख्यालयात येण्यास सुरुवात केली. दर आठवड्याला या दोन मंत्र्यांच्या आढावा बैठका मुख्यालयात होतात. त्यावेळी संबधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले जाते व बैठक संपेपर्यंत सर्व विभागाचे अधिकारी ताटकळत असतात.
हेही वाचा : महालक्ष्मी रेसकोर्स आणि विलिंग्डन क्लबसाठी ५० आजीव सदस्य नामनिर्देशित करण्याचा निर्णय रद्द करा
मात्र आता आचारसंहितेमुळे पालकमंत्र्यांच्या कामकाजाला मर्यादा येणार आहेत. केसरकर हे दर बुधवारी मुख्यालयात घेत असलेली बैठक आता होऊ शकणार नाही. बैठका घेणे, पालिकेच्या विविध कार्यालयात किंवा प्रकल्पस्थळी भेट देणे, अधिकाऱ्यांना बोलावणे या बाबी करता येणार नाहीत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली असलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.