मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य रेल्वेवर खोळंबा नाट्य सुरू आहे. मध्य रेल्वेवरील विक्रोळी येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा कोलमडली. बराच वेळा लोकल एकाच ठिकाणी उभी राहिल्याने प्रवासी हवालदिल झाले होते. अखेर लोकलमधून उतरून प्रवाशांनी रेल्वे रूळावरून चालत पुढे जाणे पसंत केले. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळावर उतरून जवळचे स्थानक गाठत होते. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलाॅकिंग यंत्रणेतील त्रुटीमुळे दररोज मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनाही विलंब होत आहे. दररोजच्या लेटलतीफ कारभारामुळे प्रवासी मेताकुटीस आले आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी ७ वाजता विक्रोळी येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. गर्दीच्या वेळी सकाळी सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरच बिघाड झाल्याने लोकल एका मागे एक उभ्या होत्या. तसेच प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. लोकल का थांबल्या याबाबत प्रवाशांना माहिती मिळत नव्हती. कार्यालयात जाण्यास विलंब होत असल्याने अनेकांनी विक्रोळी येथे लोकलमधून उतरून रेल्वे रूळावरून चालत घाटकोपर स्थानक गाठले. त्यानंतर टॅक्सी, रिक्षा किंवा मेट्रोचा आधार घेत प्रवाशांनी इच्छितस्थळ गाठले. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना लोकलमध्ये बसून राहण्यावाचून पर्याय नव्हता. घटनास्थळी मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केली.

हेही वाचा… मुंबई : कफ परेडमधील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील ४०० मीटर रस्ता मोकळा

दुरुस्तीचे काम सकाळी ७.४८ वाजता पूर्ण झाले. मात्र, या कालावधीत मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होती. तसेच वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. परिणामी, प्रवासी वातानुकूलित लोकलची वाट पाहत स्थानकात थांबले होते. लोकलच्या बिघाडाबाबत अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मध्य रेल्वेने सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लाॅक घेऊन केलेल्या कामांनंतर गेल्या दोन आठवडे लोकल विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. तर, तांत्रिक बिघाडामुळे कार्यालयात वेळेवर पोहचणे कठीण होत आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार गटात वाद? छगन भुजबळ म्हणाले, “मी इच्छूक होतो”

विक्रोळी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे लोकल थांबल्या होत्या. मात्र, काही कालावधीत तांत्रिक बिघाड दुरूस्त करून लोकल सेवा सुरू करण्यात आली. परंतु, काही लोकल वेळापत्रकानुसार न धावता विलंबाने धावत आहेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai local train services of central railway delayed due to technical fault at vikhroli station mumbai print news asj