मुंबई : मध्य रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे शनिवारी लाखो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रोजच्या लोकल प्रवासाला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट ते तिप्पट अवधी लागला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी रविवारी मोटरमन आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोटरमनने ‘असहकार चळवळ’ आंदोलन मागे घेतले आहे. अतिरिक्त तास (ओव्हरटाइम) न करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या निधनामुळे मोटरमनमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन सुरू करत अतिरिक्त तास काम न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी शनिवारी १५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या तर ३०० हून अधिक फेऱ्यांना विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी मॉरिसने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत! गोळीबाराच्या घटनेशी थेट कनेक्शन?

मोटरमनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी संघटनांसोबत चर्चा केली. यामध्ये मोटरमनच्या मागण्यांबाबत तसेच मोटरमनने धोक्याच्या स्थितीत सिग्नल ओलांडून (एसपीएडी) प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्यास त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई केली जाते. याबाबत चर्चा करण्यात आली. मोटरमनच्या मागण्या रेल्वे मंडळापर्यंत पोहोचवण्यात येतील, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. डीआरएम रजनीश गोयल यांनी आश्वासन दिले आहे की, एसपीएडी घटनांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रेल्वे मंडळाकडे सादर केला जाईल. रेल्वे मंडळ या प्रकरणावर अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत मोटरमन नोकरीच्या सुरक्षिततेची अपेक्षा करू शकतात.

हेही वाचा : ओबीसी आरक्षणात घुसखोरी रोखणार! छगन भुजबळ यांचा निर्धार

“निधन झालेल्या मोटरमनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी शनिवारी गेलेले सर्व मोटरमन कामावर रुजू झाले आहेत. रविवारी लोकल सेवा सुरळीत सुरू होती. तर सोमवारी मोटरमनच्या उपलब्धतेमुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.” -डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai local trains motormen s non cooperation protest withdrawn mumbai print news css