मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीत यंदा आधीच पक्षांच्या फोडाफोडीमुळे संभ्रमाचे वातावरण असताना त्यात आता आणखी भर पडणार आहे ती सारख्या नावांची! मुंबईत यावेळी तीन संजय पाटील आणि दोन अरविंद सावंत निवडणूकीच्या मैदानात उभे आहेत. मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या या नावांना प्रत्यक्षात किती मते मिळतात याबाबतची उत्सुकता आहे.
लोकसभेच्या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार असून एव्हाना प्रत्येक मतदार संघात किती आणि कोण कोण उमेदवार आहेत हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार यावेळी दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई या मतदार संघात सारख्याच नावांचे उमेदवार उभे आहेत. दक्षिण मुंबई मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद गणपत सावंत हे उमेदवार आहे. सावंत हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार असून शिवसेना नेतेही आहेत. पण याच मतदार संघात अरविंद नारायण सावंत हे आणखी एक उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. ते जोगेश्वरी येथील राहणारे आहेत. पण दक्षिण मुंबईत निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदार संघात नावावरून संभ्रम होण्याची शक्यता आहे. नावातील साधर्म्याचा फटका सावंत यांना बसतो का हे निवडणूकीतच समजू शकेल.
हेही वाचा : वांद्रे पूर्व येथून पिस्तुलासह चौघांना अटक
ईशान्य मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे संजय दीना पाटील उमेदवार आहेत. याच मतदारसंघात नवी मुंबईचे संजय निवृत्ती पाटील, मानखुर्द, शिवाजी नगर येथील संजय बी पाटील असे आणखी दोन उमेदवार आहेत. खरेतर या मतदार संघासाठी तब्बल चार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी दोघांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूकीच्या मैदानात आता तीन संजय पाटील उरले आहेत. सांगलीच्या शिराळा येथील रहिवासी असलेले संजय महादेव पाटील आणि नवी मुंबईतील घणसोली येथील संजय पांडुरंग पाटील यांनी भरलेले अर्ज बाद झाले आहेत.
हेही वाचा : पोलीस कोठडीत मृत्यू किती ?
दरम्यान, उत्तर मध्य मतदार संघातही वर्षा गायकवाड या नावाने तीन उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी महाविकास आघाडीतर्फे कॉंंग्रेसच्या वर्षा गायकवाड या प्रमुख उमेदवार आहेत. कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेशाध्यक्ष असून गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. अन्य दोन वर्षा गायकवाड यांचे अर्ज फेटाळले असल्यामुळे या मतदार संघातील नावांचा संभ्रम दूर झाला आहे.