मुंबई : मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या तरूणीने थेट वांद्रे वरळी सागरीसेतूवर मोटरसायकल नेल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी तरूणीला पोलिसांनी थांबावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशी तिने वाद घातला व खेळण्यातील बंदुकीने धमकावले. याप्रकरणी तरुणीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरूणी नुपूर पटेल (२६) ही मध्यप्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. तिला वरळी-वांद्रे सागरीसेतूवर असलेल्या निर्बंधाबद्दल माहिती नव्हती. भावाला भेटण्यासाठी पटेल तिच्या मोटरसायकलवरून मध्यप्रदेशातून पुण्याला गेली होती.
पुण्यातून नंतर ती मुंबईला फिरण्यासाठी आली. तिला सागरीसेतू पाहायचा होता. ती सागरीसेतूवरून दुचाकी घेऊन जात असता तिला पोलिसांनी अडवले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडल्यानंतर तरूणीला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती न ऐकता पुढे निघून गेली. मात्र तेथे तैनात असलेल्या वाहतुक पोलिसांनी तिला थांबवून ताब्यात घेतले. तिच्याकडे मोटरसायकलचे कागदपत्रे मागितले असता तिने मोटरसायकल भावाची असल्याचा दावा केला. तसेच पोलिसांशी वाद घालण्यास सुरूवात केली.
हेही वाचा : रोजगारनिर्मितीत मविआ सरकारची कामगिरी सरस; माहितीच्या अधिकारातील माहितीच्या आधारे नाना पटोले यांचा दावा
त्यावेळी तिने पोलिसांच्या दिशेने पिस्तूल सदृश्य वस्तू फेकली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन वरळी पोलीस ठाण्यात नेले. वरळी पोलिसांनी भारतीय दंड संहिते अंतर्गत सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे व निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच तरूणीला अटक करून मोटारसायकल जप्त केली. मात्र तिला न्यायालयात हजार केले असता तिची जामिनावर सुटका करण्यात आली.