मुंबई : कुंभमेळ्यासाठी तंबू व विमान तिकीट नोंदणीच्या नावाखाली मुंबईतील व्यावसायिक महिलेची चार लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. लोअर परळ येथील ५५ वर्षीय तक्रारदार महिला लाकडी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या आपल्या पतीसह प्रयागराजला जाण्याचा विचार करत होत्या. त्यासाठी त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी तंबू ऑनलाईन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी त्यांना टेन्ट सिटी महाकुंभ नावाचे संकेतस्थळ सापडले. त्यात एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर संपर्क साधला असता काही कालावधीनंतर एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे दूरध्वनी केला. त्या व्यक्तीने त्यांची व सहप्रवाशांची माहिती घेतली. तसेच दोन तंबू नोंदवण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली. तक्रारदार महिलेने ३५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर सहा प्रवाशांच्या विमान तिकीटाच्या नावाखाली त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपये घेण्यात आले. थोडेथोडे करून तक्रारदार महिलेने एकूण तीन लाख ७८ हजार रुपये आरोपींना पाठवले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेचा फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी व रक्कम परत मिळवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. त्यासाठी तक्रारदार महिलेने रक्कम पाठवलेल्या बँक खात्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून शोध सुरू आहे. तसेच या खात्यांमधील रक्कम गोठवण्याबाबतही विनंती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणती काळजी घ्याल ?

समाज माध्यमांवर अथवा इंटरनेवर कोणतीही माहिती अथवा मोबाईल क्रमांक शोधत असताना त्याची पडताळणी करा. आरोपी सर्च इंजिनमधील माहितीत बदल करून त्यात स्वतःचा मोबाईल क्रमांक अपलोड करतात. अथवा काही वेळा बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. कुंभमेळा, प्राप्तीकर, तसेच वस्तू खरेदींवर विशेष सूट देऊन फसवणूक करण्याच्या घटना सध्या वाढत आहेत. यामागे सराईत सायबर टोळ्या कार्यरत असून गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील नागरिकांच्या एक हजारांहून अधिक कोटी रुपयांच्या मलमत्तेवर आरोपींनी डल्ला मारला आहे. अशा वेळी आगाऊ रक्कम देणे टाळा. पैशांचे व्यवहार टाळा. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानतंर तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच सायबर पोलिसांच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा.

सायबर फसवणूकीची आकडेवारी

वर्षगुन्हेउकलआरोपी अटक
२०२४३१७१६१३६८३
२०२३२२१२४०४४८८
२०२२२१७५१०४१८६
२०२१११५४१४०२९४

Story img Loader