मुंबई : कुंभमेळ्यासाठी तंबू व विमान तिकीट नोंदणीच्या नावाखाली मुंबईतील व्यावसायिक महिलेची चार लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. लोअर परळ येथील ५५ वर्षीय तक्रारदार महिला लाकडी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या आपल्या पतीसह प्रयागराजला जाण्याचा विचार करत होत्या. त्यासाठी त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी तंबू ऑनलाईन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी त्यांना टेन्ट सिटी महाकुंभ नावाचे संकेतस्थळ सापडले. त्यात एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर संपर्क साधला असता काही कालावधीनंतर एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे दूरध्वनी केला. त्या व्यक्तीने त्यांची व सहप्रवाशांची माहिती घेतली. तसेच दोन तंबू नोंदवण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली. तक्रारदार महिलेने ३५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर सहा प्रवाशांच्या विमान तिकीटाच्या नावाखाली त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपये घेण्यात आले. थोडेथोडे करून तक्रारदार महिलेने एकूण तीन लाख ७८ हजार रुपये आरोपींना पाठवले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेचा फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी व रक्कम परत मिळवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. त्यासाठी तक्रारदार महिलेने रक्कम पाठवलेल्या बँक खात्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून शोध सुरू आहे. तसेच या खात्यांमधील रक्कम गोठवण्याबाबतही विनंती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा