मुंबई : प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन अतिरिक्त पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट उपलब्ध करून देत आहे. तसेच सद्यस्थितीत पादचारी पुलांवरील गर्दी विभाजित करण्यासाठी अतिरिक्त पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने नुकताच माहीम स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ ला जोडणारा २२ मीटर लांबीचा पादचारी पूल बांधला असून हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

माहीम रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेला पादचारी पूल ११ जून २०२३ रोजी बंद करण्यात आला. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन या पादचारी पुलाच्या जागी एक आधुनिक, उच्चशक्तीचा स्टेनलेस स्टील फोब बांधण्यात आला आहे. पुनर्बांधणी केलेल्या पुलासाठी अंदाजे ४.२७ कोटी रुपये खर्च आला असून हा पूल २२ मीटर लांब आणि ६ मीटर रूंद आहे. हा पूल गंजरोधक असून त्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी आयआरएस ३५० ग्रेड स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या पुलाची पुर्नबांधणी करताना ९ नोव्हेंबर २०२४ रोजी तुळया उभारण्यात आल्या. तर, १६ मार्च २०२५ रोजी डेक स्लॅब आणि जिने उभारण्यात आले.

प्रवाशांची सुरक्षितता आणि अन्य चांगल्या सोयींसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न पश्चिम रेल्वे प्रशासन करीत आहेत. माहीम येथील पादचारी पूल सुरू केल्याने, माहीम स्थानकावरील गर्दीचे विभाजन होईल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी व्यक्त केला.

दादर स्थानकातील पादचारी पूल बंद

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील पादचारी पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामानिमित्त हा पादचारी पूल शनिवारी मध्यरात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये प्रवाशांनी इतर पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गोरेगाव स्थानकातील पूल बंद

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकातील उत्तर दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचे तोडकाम आणि पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी हा पादचारी पूल २ एप्रिल २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे. हा पूल २ एप्रिल २०२५ पासून पुढील १८० दिवसासाठी सार्वजनिक वापरासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीमध्ये उत्तर दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा वापर करावा. हा पादचारी पूल जुन्या पादचारी पुलाजवळच असल्याने, प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.