मुंबई : मुंबईच्या सिनेवर्तुळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ (मामी) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील आयनॉक्स पीव्हीआर आणि रिगल या चित्रपटगृहांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवात जगभरातील पन्नासएक विविध भाषांमधील ११० हून अधिक चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महोत्सवातील विभागांमध्ये दक्षिण आशिया स्पर्धा, फोकस दक्षिण आशिया (स्पर्धाबाह्य), जागतिक सिनेमा, ट्रिब्युट्स, रिस्टोर्ड क्लासिक्स, गाला प्रीमियर्स, मास्टरक्लासेस, डायमेंशन मुंबई आणि रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश असणार आहे. तसेच यावर्षी २० पेक्षा जास्त वर्ल्ड प्रीमियर्स, २५ पेक्षा जास्त आशिया प्रीमियर्स आणि ३५ पेक्षा जास्त दक्षिण आशिया प्रीमियर्स होणार आहेत.

या महोत्सवात निवडलेल्या चित्रपटांना दक्षिण आशिया स्पर्धा पुरस्कार, नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा पुरस्कार, एक्सेलन्स इन सिनेमा, रशीद इराणी यंग क्रिटिक्स चॉईस पुरस्कार, फिल्म क्रिटिक्स गिल्ड जेंडर सेन्सिटिव्हिटी पुरस्कार, डायमेंशन्स मुंबई पुरस्कार, रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स आणि बेस्ट बुक ऑन सिनेमा आदी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हेही वाचा : आयआयटी मुंबई ‘टेकफेस्ट’ : मुंबई विभागीय प्राथमिक फेरी ६ ऑक्टोबरला, नाव नोंदणी सुरू

या वर्षी पुन्हा एकदा आम्ही भारतात न दाखवलेले जगातील उत्तम चित्रपट मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवणार आहोत. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियाई चित्रपटांकडून महोत्सवासाठी मोठ्या संख्येने अर्ज आले असल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे दक्षिण आशियाई चित्रपटांना एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही आणखी जोमाने करू, अशी भावना मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कला दिग्दर्शिका, दीप्ती डीकुन्हा यांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mami film festival 2024 to start from 19th october mumbai print news css