मुंबई : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला अवघे काही तास उरले आहेत. देशभरातील वातावरण राममय झाले असताना ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ या स्पर्धेतही रामनामाचा गजर झाला. श्रीरामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे खांद्यावर घेऊन काही धावपटू धावले. तसेच मॅरेथॉनच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ या स्पर्धेचे १९ वे पर्व रविवार, २१ जानेवारी रोजी पार पडत असून मुंबईच्या रस्त्यांवर बहुसंख्य मुंबईकर नागरिक आणि जगभरातील धावपटू धावले. काही धावपटू भगवे कपडे परिधान करून, भगवा फेटा घालून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या वातावरणात धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी मुंबई मॅरेथॉन आयोजन समितीकडूनही ध्वनीक्षेपकावर ‘भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा’ हे गाणे वाजविले जात आहे.

हेही वाचा : ईशान्य मुंबई भाजपसाठी यंदा आव्हानात्मक ?

‘मी गेल्या तीन वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. २०१८ साली मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझे वजन हे १०२ किलो होते, त्यानंतर मी व्यवस्थित पथ्य पाळून आणि विशेषतः धावून वजन हे ८२ किलोपर्यंत कमी केले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मी जवळपास १८ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. यंदा मी मुंबई मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. सध्या देशभर राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे, त्यामुळे यंदा मी मॅरेथॉनमध्ये ‘जय श्री राम’चा जयघोष करीत, खांद्यावर भगवा झेंडा घेऊन २१ किलोमीटर धावलो. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली आणि थकवाही जाणवला नाही’, असे खारदांडा कोळीवाडा येथून आलेले प्रमोद नगारी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai marathon runners ran with saffron flags of rama and chanting jay shri ram mumbai print news css