मुंबई : मुलांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर कारवाई करताना माटुंगा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. आरोपींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. मुंबई, गुजरात आणि कर्नाटकात परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात कर्नाटकातील एका डॉक्टर आणि परिचारीकेचाही सहभाग असल्याचा संशय आहे. सुटका करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या मुलीला पाच लाख रुपयांत कर्नाटकातील कारवार येथे एका दाम्पत्याला विकण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुलोचना सुरेश कांबळे (४५), मीरा राजाराम यादव (४०), योगेश भोईर (३७), रोशनी घोष (३४), संध्या राजपूत (४८), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (४४), तैनाज शाहिन चौहान (१९), बेबी मोईनुद्दीन तांबोळी (५०) आणि मनीषा सनी यादव (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मनीषा यादव ही विक्री करण्यात आलेल्या चार महिन्याच्या मुलीची आई आहे. दादर, दिवा, शिवडी, कल्याण, वडोदरा, कारवार आणि मिरज या ठिकाणी राहणारे आरोपी लग्न जमवणे, रुग्ण सेवा आणि रुग्णालयात आया म्हणून कामे करतात. विक्री केलेल्या मुलीच्या आजीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारदार शीव-माहीम लिंक रोड परिसरात वास्तव्यास असून तिने ११ डिसेंबर रोजी सुनेविरोधात चार महिन्याच्या मुलीला बंगळुरू येथे नेऊन विक्री केल्याची तक्रार पोलिसाकडे केली होती.

हेही वाचा : मुंबई : आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ आजपासून

या तक्रारीची दाखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, मनीषा यादव हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने बाळ वडोदरा येथे राहणाऱ्या मदिना उर्फ मुन्नी आणि तैनाज यांच्या मदतीने कर्नाटक येथील दामप्त्याला विकल्याची कबुली दिली, त्यासाठी तिला एक लाख रुपये मिळाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

हेही वाचा : मुंबई : कचऱ्यावर शुल्क आकारणीचा निर्णय अनिर्णित, महापालिका निवडणुकीमुळे कर आकारण्याची शक्यता कमी

परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त रागासुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील माटुंगा आणि इतर पोलीस ठाण्याचे एक पथक या गुन्ह्याच्या तपास करत होते. या पथकाने वडोदरा तसेच ठाणे, मुंबई, दिवा कल्याण आणि कर्नाटक येथून एका पुरुषासोबत आठ महिलांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता मुलीला कारवार येथील एका दाम्पत्याल पाच लाख रुपयांना विकल्याची माहिती मिळाली, त्यातील १ लाख रुपये मुलीच्या आईला देण्यात आले तर, तर इतर महिलांना प्रत्येकी १० ते १५ हजार मिळाले. मुलांची विक्री करणाऱ्या टोळीमध्ये कारवार येथील एका स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आणि परिचारिकेचा सहभाग असल्याची माहिती अटक आरोपीना दिली. कारवार येथून विक्री करण्यात आलेल्या ४ महिन्यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीने आतापर्यंत पाच ते सहा मुलांची विक्री केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अटक आरोपीना भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना १९ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून डॉक्टर आणि परिचारीकेसह आणखी काही जणांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai matunga four month old baby sold for rupees 5 lakhs with the help of doctor 8 woman arrested mumbai print news css