‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली, अंधेरी पूर्व मेट्रो ७’ मार्गिका अखेर शुक्रवारी दुपारी ४ वाजता पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी या मार्गिकांतील दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या टप्प्यातील प्रवासी वाहतूक सुरू केली. आता दहिसर – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर आणि दहिसर – गुंदवली, अंधेरी पूर्व असा थेट प्रवास या मार्गिकांमुळे अनुक्रमे अवघ्या ४० व ३५ मिनिटांत करता येणार आहे.
पहिल्याच दिवशी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी नागरिक स्थानकांवर जमले होते. ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील दहिसर – डहाणूकरवाडी असा पहिला टप्पा आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर – आरे असा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून ‘मेट्रो २ अ’मधील वळनई – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर आणि ‘मेट्रो ७’मधील गोरेगाव पश्चिम – गुंदवली असा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला.
हेही वाचा – राज ठाकरे उद्या ठाण्यात; मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरातील दुसरा दौरा
हेही वाचा – मुंबई : अंडे दोन रुपयांनी महागले, दर प्रति डझन २० ते २४ रुपयांनी वधारले
या मार्गिकांमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरे मेट्रोने जोडली जाणार असून या दोन मार्गिका ‘घाटकोपर-वर्साेवा मेट्रो १’ मार्गिकेला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरून प्रवास करणारे प्रवासी अंधेरीवरून पुढे ‘मेट्रो १’ने वर्सोवा आणि घाटकोपरला जाऊ शकणार आहेत. हा प्रवास काही मिनिटांत आणि गारेगार होणार असल्याने या मेट्रो मार्गिकांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दररोज या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून तीन ते चार लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी केला.