मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (‘एमएमआरडीए’) आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (‘एमएमएमओसीएल’) ‘दहिसर पश्चिम – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवास अधिकाधिक सुकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून आता प्रवाशांना अधिक सोप्या पद्धतीने तिकीट उपलब्ध करण्यासाठी व्हॉट्सॲपची मदत घेण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील गुंदवली मेट्रो स्थानकात शुक्रवारी मेट्रोचे तिकीट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करण्याची सेवा महिला प्रवाशांच्या हस्ते सुरू करण्यात आली.
मेट्रो प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने तिकिटाचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ‘एमएमएमओसीएल’च्या ॲपवरून तिकीट काढता येते. यापुढे ॲपचा वापर न करता प्रवाशांना मेट्रोचे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने व्हॉट्सॲप तिकिटाचा पर्याय उपलब्ध केला आहे. प्रवाशांसाठी ही सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ८६५२६३५५०० या व्हॉट्स ॲप क्रमांकावर ‘Hi’ असे लिहून पाठवून किंवा स्थानकांवरील क्यूआर कोड स्कॅन करून संभाषणात्मक यंत्रणेच्या (कन्व्हर्सेशनल इंटरफेस) माध्यमातून तिकीट खरेदी करता येणार आहे. यासाठी डेबिट कार्ड वा क्रेडिट कार्डद्वारे तिकिटाची रक्कम अदा करता येणार आहे. या सेवेमुळे तिकीट जलद उपलब्ध होणार असून प्रवाशांसाठी मोठी सोय होईल, असा दावा ‘एमएमएमओसीएल’कडून करण्यात आला आहे.
हेही वाचा : नवी मुंबई विमानतळावरील चाचणीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “वायुदलाचा वेळ अन्…”
दरम्यान, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांचा ई – तिकीट वापरण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गिकांवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांच्या ६२ टक्के प्रवासी ई-तिकीटाचा वापर करतात. तर तीन टक्के प्रवासी मोबाइल क्यूआरकोड तिकीट खरेदी करतात. त्याचवेळी एनसीएमसी कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३५ टक्के आहे. ही बाब समाधानकारक असल्याचे ‘एमएमएमओसीएल’कडून सांगण्यात आले. आता व्हॉट्सॲप तिकीट सेवेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ‘एमएमएमओसीएल’ने व्यक्त केला.