मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहेत. तर २४ नोव्हेंबरला पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर ५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत ४५ हजारांहुन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया २० ऑक्टोबरला संपुष्टात येणात असतानाच आता ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हि दुसरी मुदतवाढ आहे. इच्छुकांना अधिवास प्रमाणपत्र आणि इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार दोनदा मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण मुळात सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ देण्याची वेळ येत असल्याची चर्चा आहे. नवीन वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. तर ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे.

हेही वाचा : समूह पुनर्विकासात उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीविनाच ७५ मजली इमारतीस मुभा! शासनाकडूनच इमारत परवानगीत भेदभाव

३१ ऑक्टोबरपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करत अर्ज सादर करता येणार आहे. अर्जविक्री-प्रक्रिया संपल्यानंतर सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ८ नोव्हेंबरला सायंकाळी ०५.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी २० नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mhada extends deadline for pune housing lottery till october 31 5863 homes available in scheme mumbai print news css