मुंबई : दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू कलेल्या विशेष अभियानाला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानाची मुदत गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत होती. मुंबई मंडळाने गुरुवारी या अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे आता ज्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांना आता १५ मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करून पात्रता निश्चिती करून घेता येणार आहे.
मुंबई मंडळाकडे घरासाठी अर्ज केलेल्या कामगार आणि वारसांपैकी एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती सोडतीआधीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मंडळाने विशेष अभियान सुरू केले आहे. त्यानुसार मुंबई मंडळ या कामगार आणि वारसांकडून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेत आहे. तर कामगार विभाग पात्रता निश्चिती करत आहे. या अभियानाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या कालावधीत अनेक कामगार, वारस कागदपत्रे जमा करू शकले नव्हते. त्यामुळे या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली. आता शेवटची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती. मात्र त्याच दिवशी मंडळाने या अभियानाला पुन्हा मुदतवाढ दिली.
नवीन मुदतवाढीनुसार आता १५ मार्चपर्यंत कामगार, वारसांना कागदपत्रे जमा करता येणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत एक लाख आठ हजार ४९२ कामगार आणि वारसांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा केली आहेत. त्यापैकी ८९ हजार ६४८ कामगार – वारसदार पात्र ठरले असून उर्वरित कागदपत्रांची छाननी करून पात्र – अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. ज्या कामगारांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांनी १५ मार्चपर्यंत ती जमा करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.