मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची सोडत अद्यापही रखडलेलीच आहे. ही सोडत १३ डिसेंबर २०२३ ला प्रस्तावित होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती पुढे ढकलण्यात आली असून आता सोडत रद्द करून एक महिना होत आला तरी सोडतीची नवीन तारीख जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ म्हाडाला मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. तर २४ हजार इच्छुक अर्जदार प्रतिक्षेत आहेत.
हेही वाचा : ताप, सर्दी, खोकला असल्यास करोना चाचणी करा, राज्य करोना कृती दलाच्या सूचना
कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी १५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली. त्यानंतर १७ नोव्हेंबरला मुदत संपली. या मुदतीत ३१ हजार ४३३ अर्ज सादर झाले. त्यातील अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे २४ हजार ३०३ अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरले आहेत. सोडतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून सोडतीसाठी म्हाडा, कोकण मंडळ पूर्णतः सज्ज आहे. पण सोडतीसाठी म्हाडाचा मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. मुळात ही सोडत ७ नोव्हेंबरला होणार होती. पण कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने ७ नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलून १३ डिसेंबरला सोडत काढण्याचे मंडळाने जाहीर केले. १३ नोव्हेंबरच्या सोडतीला काहीच दिवस शिल्लक असताना प्रशासकीय कारण देत सोडत पुढे ढकलली. सोडत पुढे ढकलूनही आता एक महिना उलटला तरी नवीन तारीख जाहीर झालेली नाही. म्हाडाकडून मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली असून इच्छुक २४ हजार अर्जदार नवीन तारखेकडे डोळे लावून आहेत.