मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या २१ झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडाकडे सोपविण्यात आल्या आहेत. या योजनांमधील सर्वात मोठी मालाड, मालवणी येथील १४ हजार झोपड्यांचा समावेश असलेली झोपु योजना मार्गी लावण्यासाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने पहिले पाऊल उचलले आहे. ५१ हेक्टर जागेवर वसलेल्या राजीव गांधी नगरच्या पुनर्वसन योजनेसाठी सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शनिवारी मुंबई मंडळाने एक निविदा प्रसिद्ध केली. या निविदेनुसार वास्तुविशारद प्रकल्प आराखडा तयार करण्यासह निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही म्हाडाची आतापर्यंतची सर्वात मोठी झोपु योजना आहे.

आतापर्यंत म्हाडाच्या तीन योजनांना आशय पत्र

राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाला रखडलेल्या २१ झोपु योजना झोपु प्राधिकरणाने सोपविल्या आहेत. यापैकी व्यवहार्य १७ योजना मुंबई मंडळ मार्गी लावणार आहे. त्यानुसार याआधी मंडळाने जोगेश्वरीतील साई बाबा झोपु योजना, कुर्ल्यातील श्रमिक नगर आणि चेंबूरमधील जागृती झोपु योजना हाती घेतली आहे. या तिन्ही योजनांसाठी झोपु प्राधिकरणाकडून मंडळास आशय पत्र (एलओआय) प्राप्त झाले आहे. लवकरच या योजना मार्गी लागणार आहेत. पण आता मात्र मंडळाने सर्वात मोठी झोपु योजना हाती घेतली आहे. आशय पत्र मिळालेल्या तीन योजना अगदी छोट्या, १५०० ते २००८ चौरस मीटर जागेवरच्या आहेत. पण मंडळाच्या गोरेगाव विभागाने हाती घेतलेल्या राजीव गांधी नगर पुनर्वसन योजनेअंतर्गत ५१ हेक्टरवरील तब्बल १४ हजार झोपड्यांचे पुनवर्सन केले जाणार आहे. संयुक्त भागीदारी तत्वावर राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन योजनेसाठी आता मंडळ सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती करणार आहे. यासाठी मंडळाने निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सल्लागाराची कामे

योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा, निविदा दस्तऐवज तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आणि प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रकल्प नियोजन सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार इच्छुक कंपन्यांना ६ मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. सल्लागार – वास्तुविशारदान्या नियुक्तीनंतर आराखडा तयार करून त्यास मान्यता घेत या योजनेस झोपु प्राधिकरणाकडून शक्य तितक्या लवकरच आशय पत्र मिळविण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

१५ वर्षांपासून रखडलेली योजना

राजीव गांधी नगर झोपु योजना खासगी विकासकाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येणार होती. त्यासाठी विकासकाची नियुक्तीही केली होती. मात्र हा प्रकल्प आर्थिक आणि तांत्रिक कारणामुळे अव्यवहार्य ठरल्याने १५ वर्षांपासून ही योजना रखडली होती. परिणामी १४ हजार झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. पण आता मात्र त्यांची ही प्रतीक्षा संपणार असून येत्या सहा वर्षांत त्यांचे पुनर्वसनाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे राजीव गांधी नगरमधील १४ हजार झोपडीधारकांना हा मोठा दिलासा आहे. दरम्यान, या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला मोठ्या संख्येने सोडतीसाठी अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांची नेमकी संख्या आराखडा अंतिम झाल्यास जाहीर होईल.

रमाबाई नगरच्या धर्तीवर पुनर्वसन

एमएमआरडीए घाटकोपरमधील माता रमाबाई नगर, कामराज नगरचे पुनर्वसन संयुक्त भागीदारी तत्वावर करीत आहे. ही योजनेप्रमाणेच राजीव गांधी नगर योजनाही मार्गी लावली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रमाबाई नगर योजना जितकी मोठी आहे, तितकीच राजीव गांधी नगर योजनाही मोठी आहे. रमाबाई नगर पुनर्वसन योजनेद्वारे तब्ब्ल १४,४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर राजीव गांधी नगरमधील झोपड्यांची संख्याही रमाबाई नगरप्रमाणे १४ हजार इतकी आहे.