मुंबई : वायू प्रदुषणाच्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन न केल्याप्रकरणी ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम करणाऱ्या दोन कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावून काही दिवस काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) याची गंभीर दखल घेऊन या दोन्ही कंत्राटदारांना तात्काळ अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम करणाऱ्या सर्वच कंत्राटदारांना वायू प्रदुषणाबाबतच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तर नोटीस बजावण्यात येईल, असा इशाराही एमएमआरसीने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : लोकलवर दगड फेकणारा आरोपी अटकेत

एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे विविध टप्प्यात आणि विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करीत आहे. ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामादरम्यान प्रदुषणाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असल्याचे एमएमआरसीकडून सांगितले जात आहे. असे तरी अनेक कंत्राटदार या नियमांचे उल्लंघन करीत असल्याची बाब नुकतीच महानगरपालिकेच्या कारवाईतून समोर आली आहे. वायू प्रदूषण नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या एच – पूर्व विभागाने बीकेसी आणि विद्यानगर येथील ‘मेट्रो ३’च्या कामाची पाहणी केली असता तेथे अनेक नियमांचे पालन केले जात नसल्याची बाब उघड झाली. त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ या दोन्ही कंत्राटदारांना नोटीस बजावत काही दिवस काम थांबविले आहे. तर सर्व नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे.

हेही वाचा : मुंबई : अखेर म्हाडाला डीआरपीकडून ५०० कोटी परत मिळाले

महानगरपालिकेच्या या कारवाईची एमएमआरसीने गंभीर दखल घेतली असून या दोन्ही कंत्राटदारांना अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व कंत्राटदारांना वायू प्रदुषणाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्यावर नोटीस बजावून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंत्राटदारांना देण्यात आल्याचे एमएमआरसीच्या प्रवक्त्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mmrc orders both contractors of metro line to submit compliance report also follow the guidelines about the air pollution mumbai print news css
Show comments