मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील १३ स्थानकांजवळ ५०० झाडे लावली असून आता आणखी २६०० झाडे लावण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. त्यामुळे आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानकांचा परिसर हिरवागार होणार आहे. एमएमआरसीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या हमीपत्रानुसार ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानक परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. सीप्झ, एमआयडीसी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. आता इतर स्थानकांजवळ २६०० झाडे लावण्यात येणार आहेत. एमएमआरसीने मुळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन कंत्राटे दिली आहेत.
नियुक्त केलेल्या कंत्राटदारांवर रोपवाटीकेत रुजलेल्या झाडांचा पुरवठा, लागवड आणि देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या झाडांची मुळ जागी लागवड करण्यात येत आहे. साधारण सात वर्ष वयोमान असलेली आणि १५ फूट उंचीची फुलझाडे, शोभेची झाडे, सदैव हिरवीगार राहणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येत आहे. मुळ जागी वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी बदाम, आकाश नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा, आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे, तीन वर्ष देखरेख, नियमित सिंचन आणि बागायती पद्धतीने संवर्धन करण्याची जबाबदारी त्याच कंत्राटदारांवर आहे.