मुंबई : दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी हलक्या वाहनांना टोल माफी देण्यात आल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चित्रफीत वाहनचालकांना दाखवत मनसे कार्यकर्त्यांनी मुलुंड आणि पनवेल टोलनाक्यांवर जनजागृती सुरू केली आहे. हलक्या वाहनांना टोल न भरता पुढे जाण्याचे आवाहन केले जात आहे. तर मनसेच्या या जनजागृती आंदोलनाप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना मुलुंड टोलनाका येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. सोमवारी राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन टोल हा एक मोठा घोटाळा, भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. तर टोल दरवाढ मागे न घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर काही वेळातच कार्यकर्त्यांनी पनवेल आणि मुलुंड टोलनाक्यावर धाव घेऊन वाहने अडवून जनजागृती मोहीम सुरू केली. हलकी वाहने थांबवून मनसे कार्यकर्ते त्यांना फडणवीस यांची हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आल्यासंबंधीची चित्रफीत दाखवून टोल न भरण्याचे आवाहन करीत होते. अनेक हलकी वाहने टोल न भरता सोडण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाला.

हेही वाचा : माहिती आद्ययावत न करणारे २९१ प्रकल्प अडचणीत ? संबंधित प्रकल्पांनी १० नोव्हेंबरपर्यंत दंड भरून प्रपत्र संकेतस्थळावर न टाकल्यास नोंदणी होणार रद्द

तर दुपारी २ च्या दरम्यान पोलीस मुलुंड टोलनाक्यावर पोहोचले आणि त्यांनी अविनाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यानंतरही मुलुंड येथे मनसे कार्यकर्त्यांचे जनजागृती आंदोलन सुरूच होते. टोल दरवाढ मागे घेतल्याशिवाय, हलक्या वाहनांना टोलमुक्ती दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे टोलचा मुद्दा येत्या काळात आणखी वादग्रस्त होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mns leader avinash jadhav detained by police mns workers aggressive on panvel and mulund toll plaza mumbai print news css
Show comments