मुंबई : एटीएम यंत्रामध्ये चिकटपट्टी चिकटवून ग्राहकांची रक्कम पळवणाऱ्या दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. एटीएम यंत्रातून रोख रक्कम बाहेर येणाऱ्या ठिकाणी आतील बाजूस आरोपी चिकटपट्टी चिकटवायचे. त्यामुळे रोख रक्कम मशीनमध्येच अडकून रहायची. एटीएम कार्डधारक तेथून निघून गेल्यानंतर आरोपी ती रक्कम काढून घ्यायचे. यंत्रणेच्या सतर्कतेमुळे या दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तक्रारदार अभिषेक कुमार सिंह हे एटीएम यंत्राची सुरक्षा पाहणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. एटीएम यंत्रातला चिकटपट्टी चिकटवून त्यातून ग्राहकांची रक्कम चोरण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे सिंह यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणातील हालचालींवर लक्ष ठेऊन होते. मालाड येथील एस. व्ही. रोडवरील एमटीएनएनल इमारतीजवळील खासगी बँकेच्या एटीएम केंद्रात रविवारी दोन व्यक्ती संशयीत कृत्य करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात आढळले. त्यावेळी त्यांनी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याला तात्काळ एटीएममध्ये जाण्यास सांगितले.
हेही वाचा : दुबईच्या चलनी नोटांऐवजी कोरे कागद देऊन चार लाखांची फसवणूक, दोन आरोपी अटकेत
तसेच सिंहही तेथे पोहोचले. त्यावेळी त्यांच्या कर्मचाऱ्याने दोन संशयीतांना ताब्यात घेतले होते. आरोपींनी एटीएम यंत्रामधून पैसे बाहेर येत असलेल्या ठिकाणी चिकटपट्टी चिकटवली होती. प्रदीपकुमार मौर्या व दीपक सरोज असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. आरोपींना मालाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सिंह यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात चोरीचा प्रयत्न व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी यापूर्वीही अनेक ठिकाणी चोरी केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : तणावग्रस्त तरुणांच्या संख्येत वाढ, १८ ते ४५ वयोगटातील तरुण मानसिक आजाराने त्रस्त
अशी करायचे चोरी?
आरोपी एटीएम यंत्रामधून पैसे बाहेर येत असलेल्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने चिकटपट्टी चिकटवायचे. ग्राहकाने पिनकोड व रक्कम यंत्रावर नोंदवल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे वजा व्हायचे. पण ते चिकपट्टीमुळे बाहेर यायचे नाहीत. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर यंत्रामध्ये बिघाड असल्याचे समजून ग्राहक तेथून निघून जायचे. पण त्यांची रक्कम सुमारे १० मिनीटे एटीएम यंत्रामध्येच अडकून रहायची. आरोपी त्यानंतर तेथे पोहोचून चिकटपट्टी काढायचे. त्यानंतर ती रक्कम एटीएममधून बाहेर यायची. आरोपी ती रक्कम चोरायचे. आरोपींना या कार्यपद्धतीबाबत कशी माहिती मिळाली, तसेच त्यांनी किती रकमेची चोरी केली. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.