मुंबईः फॉरेक्स मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली देशभरातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या कक्ष-८ने कारवाई केली. या कारवाईत १४ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींनी देशभरात शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मालाड, चिंचोली बंदर येथील ‘क्वॉटम टॉवर’च्या पहिल्या मजल्यावर ‘कॉन्टिक इन्फोटेक कंपनी’ नावाने बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ८ चे पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पडताळणी केली. या कॉलसेंटरमध्ये ऑनलाईन मॅच ट्रेडर ॲप्लीकेशनद्वारे लोकांची वैयक्तिक माहिती मिळविण्यात येत होती. त्यानंतर त्यांना ऑनलाईन अप्लीकेशनद्वारे फोन करून, इंग्लडमधून व्हीएफएक्स मार्केट या ब्रोकींग कंपनीतून बोलत असल्याचे भासवण्यात येत होते. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास खात्रीशीर व जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांना व्यवहार करण्यास भाग पाडण्यात येत होते. गुंतवणूकदारांकडून लाखो रूपये बेकायदेशीरपणे हस्तांतरित करून घेण्यात येत होते. तसेच व्यवहाराला सुरुवात करताच आरोपी स्वतःच गुंतवणूकदारास प्रथम फायदा झाल्याचे भासवत होते. त्यानंतर पुन्हा गुंतवणूकदाराकडून आणखी पैसे उकाळून त्यांचे ट्रेडिंग ॲपमध्ये नुकसान झाल्याचे भासवून गुंतवणूकदारांचे लाखो रूपये लुबाडत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : नवी मुंबई विमानतळावरील चाचणीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “वायुदलाचा वेळ अन्…”

या पडताळणीनंतर कक्ष ८ मधील अधिकारी /अंमलदार यांची पथके तयार करून त्या ठिकाणी छापा घालण्यात आला. या कॉल सेंटरमध्ये एकूण १४ व्यक्ती सापडले. त्यांच्या ताब्यातून एकूण दोन लॅपटॉप, १६ डेस्कटॉप, २ मोबाइल फोन व गुन्ह्याविषयी इतर कागदपत्रे असे एकूण अडीच लाख रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. या सर्व आरोपींविरोधात मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१९ (२), ३१८ (४) तसेच भारतीय तार अधिनियम २५ (क) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सह कलम, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व १४ आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.