मुंबई : मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर धरला आणि मुंबईकरांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली. परिणामी, मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे लोकल सेवा मंदावली. अनेक लोकल एका मागे एक संथगतीने चालत होत्या. विस्कळीत झालेल्या लोकल सेवेमुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात १५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या.
मुंबईसह ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. नदी आणि पुलावरून पाणी वाहू लागल्याने, रस्ते मार्ग ठप्प झाले. परिणामी, मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मार्ग स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी लोकल फेऱ्यांची वारंवारता मंदावली. सकाळ आणि सायंकाळी, गर्दीच्यावेळी प्रवाशांची समस्या आणखीन वाढली. कल्याण, बदलापूर, कर्जत या भागात जास्त पाऊस पडल्याने, तेथील लोकल सेवेवर परिणाम झाला. बदलापूर ते वांगणी या रेल्वे मार्गादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव ताशी ३० किमी रेल्वेची वेगमर्यादा ठेवली होती. त्यामुळे या मार्गावरील अनेक फेऱया रद्द झाल्या. काही अंशत: रद्द झाल्या आणि अनेकांना विलंब झाला. सीएसएमटीकडे येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल २० ते ४० मिनिटे, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – बेलापूर, पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल १० ते १५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते २० मिनिटे विलंबाने धावल्या.
हेही वाचा : न्यायालयाच्या आवारात एकेरी वापराच्या प्लास्टिकला बंदी
विक्रोळी-घाटकोपरदरम्यान अप मार्गावरील रेल्वे रुळाला गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तडा गेल्याने लोकल सेवा खोळंबली. घटनास्थळी रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत, सायंकाळी ६.२० च्या सुमारास रेल्वे रूळ पूर्ववत केला. मात्र, या मार्गावरून ताशी ३० किमी वेगाने लोकल चालवण्यात आल्या. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने बेस्टचे २५ पेक्षा जास्त बसचे मार्ग वळवले होते. तर, मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावरील एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती.
मुंबई -पुणे गाड्या रद्द
मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी ते पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी ते पुणे प्रगती आणि पुणे ते सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन एक्स्प्रेस रद्द केल्या. तर, २६ जुलै रोजी पुणे ते सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे ते सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : शिखऱ बँक गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालाविरोधात ११ निषेध याचिका
हवामानामुळे मुंबई विमानतळावर येणारी १० विमाने अहमदाबाद, सुरत, हैद्राबाद, इंदोर आणि मोपा येथे वळवण्यात आली. ही सर्व विमाने सायंकाळपर्यंत मुंबईत रवाना झाली. तर, काही विमाने रद्द करण्यात आली. तसेच मुंबई विमानतळावरील मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे गुरुवारी सकाळी ८.३२ ते सकाळी ८.४३ वाजेपर्यंत ११ मिनिटांसाठी आणि सकाळी १०.३६ ते सकाळी १०.५० वाजेपर्यंत १९ मिनिटांसाठी दोनदा धावपट्टी बंद ठेवण्यात आली.