मुंबई : शहरात वन्यप्राण्यांच्या तस्करीच्या घटना वाढत असल्या तरी वन्यप्राणी, पक्ष्यांबद्दल संवेदनशील असणाऱ्या मुंबईकरांनी मुसळधार पावसातही घराच्या गॅलरीत सापडलेले पक्ष्याचे छोटे पिल्लू, वाहनतळात दिसलेला साप किंवा जखमी झालेला वन्यप्राणी असो वन विभाग, बचाव पथक संस्थांशी संपर्क साधून प्राण्यांच्या मदतीसाठी धावपळ केली. दरम्यान, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत एकूण ४४ प्राणी, पक्षी वाचवण्यात आले. मुंबई बरोबरच पालघर, रायगड आणि ठाणे या भागातून देखील प्राणी, पक्षी वाचवण्यात आले.
हेही वाचा : मुंबई: विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही सुट्टीबाबत संभ्रम
शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्राणी जखमी झाले आहेत. त्यात मांजर, कुत्रा आणि माकड आदी प्राण्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी मांजराची पिल्ले पाण्यात अडकलेली आढळून आली. काही प्राणी साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्यावरील खांबांना आदळून जखमी झाले आहेत तर पक्ष्यांच्या पंखांना इजा झाली आहे. जखमी अवस्थेत सापडलेले प्राणी,पक्षी निदर्शनास आल्यावर स्थानिक नागरिक संपर्क साधतात. वन विभागाकडूनही आम्हाला बोलावणे येते. मदतकार्यसाठी सोमवार आणि मंगळवारी एकूण ९५ फोन आले. या दोन दिवसांत ४४ प्राणी, पक्षी वाचवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून काहींना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तर काहींवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअरचे पवन शर्मा यांनी दिली.