मुंबई : केईएम रुग्णालयात जीवन रक्षक प्रणाली धूळखात पडली असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता शववाहिनीही दीड महिन्यांपासून वाहनचालकाविना गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे. शववाहिनी उपलब्ध नसल्याने रुग्णालयामध्ये मृत्यू होणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी शववाहिनी चालकांकडून नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केईएम रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षांपासून शवागारापासून मृतदेह घरपोच पोचविण्यासाठी महानगरपालिकेची मोफत शववाहिनी पुरवण्यात येत आहे. त्यासाठी केईएम रुग्णालयामध्ये दोन शववाहिन्या होत्या. या दोन्ही शववाहिन्यांवर असलेले चालक निवृत्त झाल्यानंतर नव्याने चालकांची नियुक्ती करण्यात आली नाही. शववाहिनीसाठी चालक उपलब्ध नसल्याने दोन्ही शववाहिन्या भायखळा येथील गॅरेजमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दीड महिन्यांपासून शववाहिन्या नसल्याने ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतदेह घरी नेण्यासाठी खासगी शववाहिनीची व्यवस्था करावी लागते.

हेही वाचा : अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण यांवर कठोर कारवाई करा, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

केईएममधील शववाहिनी उपलब्ध नसल्याने खासगी शववाहिनी चालक हे नातेवाईकांकडून मनमानी भाडे आकारत नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यांपासून नातेवाईकांना होत असलेला त्रास लक्षात घेत या शववाहिन्या तातडीने रुग्णालयाच्या सेवेत आणाव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनाचे (उबाठा) माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिला आहे. दरम्यान यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या परिवह विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी केईएम रुग्णालयामध्ये सध्या शववाहिनी व चालक उपलब्ध असल्याचे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mortuary vehicles without drivers in kem hospital relatives of deceased in financial trouble mumbai print news css