मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना फसवणुकीद्वारे विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. तसेच, वायकर यांना विजयी घोषित करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध ठरवून रद्द करण्याची मागणीही याचिकाकर्च्यांनी केली आहे.

या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी ही याचिका केली आहे. या मतदारसंघातील मतमोजणीशी संबंधित नोंदी सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत. त्यानंतर, त्याची पडताळणी केल्यावर वायकर यांना वियजी घोषित करणारा निर्णय रद्दबातल करण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. परंतु, फेरमोजणीच्या मागणीनंतर वायकर यांना अवघ्या ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा : पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द, अतिरिक्त रेक अभावी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द

निवडणूक आयोग या मतदारसंघातील मतमोजणीचे काम पारदर्शी पद्धतीने करण्यात अपयशी ठरले आहे, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव येथील नेस्को येथे पार पडली. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. पंरतु, नंतर टपाल मतपत्रिका पुनर्मोजणीची मागणी वायकर यांच्याकडून करण्यात आली. विविध घडामोडींनंतर वायकर ४८ मतांने विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव यांचा मोबाइल फोन वायकर यांच्या कन्या प्राजक्ता महाले आणि मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी वापरला. तसेच, प्राजक्ता या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून अवघ्या दोन फूटांच्या अंतरावर बसल्या होत्या. तर, टपाल मतपत्रिका मोजण्यापूर्वी पांडिलकर याच्या मोबाइलवर आलेला ओटीपी वापरून मतदान यंत्र सुरू करण्यात आले, असा असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. पोलीस मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते आणि एका पोलीस अधिकाऱ्याला वायकर यांचे सतत फोन येत होते, असा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी आपण तोंडी तक्रार करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर, तहसीलदारांच्या नावाने तक्रार नोंदवण्यात आली. पण, त्यात आपल्याला साक्षीदार दाखवण्यात आल्याचेही शहा यांनी याचिकेत म्हटले आहे.