मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या ठिकाणच्या २९ एकर जागेवर उत्तुंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त भागिदारी प्रकल्पाअंतर्गत या जागेचा विकास करण्यासाठी मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘अदानी’, ‘एल ॲण्ड टी’ आणि ‘मायफेअर’ या कंपन्यांनी यासाठी निविदा सादर केल्या आहेत. या निविदांची छाननी करून लवकरात लवकर निविदा अंतिम करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे उद्दिष्ट आहे. या जमिनीच्या विकासातून ‘एमएसआरडीसी’ला आठ हजार कोटींहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Video: गोष्ट मुंबईची – मुंबई आणि आदिवासी नेमका संबंध काय? पुरावे कोणते?
वांद्रे-वरळी सागरी सेतूलगत ‘एमएसआरडीसी’चे मुख्यालय आहे. या मुख्यालयानजीकच २९ एकर जागा असून, त्याचा वापर ‘एमएसआरडीसी’कडून वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या कामाअंतर्गत कास्टींग यार्ड म्हणून करण्यात आला होता. याच जागेचा आता विकास करून निवासी वा व्यावसायिक इमारत उभारून त्यातून महसूल मिळविण्याचे ‘एमएसआरडीसी’चे उद्दीष्ट आहे. या जागेच्या विकासकासाठी जानेवारीत विकासक नियुक्त करण्याकरिता ‘एमएसआरडीसी’ने स्वारस्य निविदा जारी केल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निविदापूर्व बैठकीत यासाठी गोदरेज प्रॉपर्टीज, अदानी रिॲलिटी, सनटेक रिॲलटी, के. रहेजा, एल ॲण्ड टी रिॲलटी, वाधवा ग्रुप, रुणवाल, ओबेरॉय रिॲलटी, लोढा आदी कंपन्यांनी उत्सुकता दाखविली होती. पण प्रत्यक्षात मात्र तीनच कंपन्यांनी निविदा सादर केल्याचे स्पष्ट झाले. वांद्रे रेक्लेमेशन येथील जागेचा विकास करण्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.