मुंबई : पाचव्या दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळ्या समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत महानगरपालिका कर्मचारी, कामगारांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी श्रमदान करून निर्माल्यासह प्लास्टिक तसेच भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कित्येक मेट्रिक टन कचरा गोळा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईला लांबलचक आणि सुंदर किनारपट्टी लाभल्याने अनेक सार्वजनिक मंडळांसह घरगुती मूर्तींचे समुद्रात विसर्जन केले जाते. पाच दिवसाचे विसर्जन पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात निर्माल्य संकलन करण्यात आले. त्याचप्रमाणे समुद्राच्या भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा देखील काढण्यात आला. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा : विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जी उत्तर विभागात, माहीम समुद्र किनारी महानगर पालिका कर्मचाऱ्यांसह ‘युनायटेडवेज’ या स्वयंसेवी संस्थेच्या ६२ स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवित ५.६ मेट्रिक टन कचरा संकलित केला. वर्सोवा समुद्र किनारी ५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ४० स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला. ‘वारसा आणि पर्यावरण संवर्धन फौंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या ५० स्वयंसेवकांच्या सहकार्याने जुहू समुद्र किनारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्यात ५.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

हेही वाचा : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे खंडणीची मागणी; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पी उत्तर विभागाच्यावतीने आणि धीरजलाल शहा महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून मार्वे समुद्र किनारी स्वच्छता केली. या मोहिमेत ४ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ए विभागाच्यावतीने बधवार पार्क येथे स्वच्छता मोहीम राबवित ४ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ११ स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. विविध समुद्री किनारी संकलित झालेल्या या कचऱ्याची महानगरपालिकेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai municipal corporation and ngo run cleaning campaign at beach 5 6 mt garbage collected mumbai print news css