मुंबई: मोबाइल घेण्यावरून झालेल्या वादातून १६ वर्षांच्या तरूणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या २० वर्षांच्या तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. फरदीन युनुस खान (१६) असे मृत तरूणाचे नाव असून तो मालाड पूर्व येथील धनजी वाडी येथील रहिवासी आहे. त्याच्या हत्येप्रकरणी शेजारी राहणाऱ्या आमिर गुल्लू साजेदा (२०) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबई : उपनगरात गारवा…
आरोपीविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे व एक वनराई पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही शेजारी राहतात. फरदीनने आरोपी आमीरचा मोबाइल घेतला होता. तो त्याने परत केला नाही. त्यावरून बुधवारी दोघांमध्ये भांडण झाले. त्यावरून उभयतांमध्ये मारामारी झाली. त्यात आमीरच्या नाकाला जखम झाली. त्यामुळे संतापलेल्या आमीरने फरदीनवर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या फरदीनला म. वा. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी फरदीनला मृत्यू घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आमीरला अटक केली. हत्येत वापरलेला चाकू अद्याप सापडला नसून त्याबाबत आरोपीची चौकशी सुरू आहे.